जीपला बांधल्याबद्दल लष्कराविरुद्ध काश्मीर पोलिसांची FIR

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीदरम्यान 9 एप्रिल रोजी हा व्हिडिओ काढण्यात आल्याचे मानले जाते.

श्रीनगर : एका व्यक्तीला जीपच्या पुढे बॉनेटवर बांधून त्याचा दगडफेकीविरुद्ध ढाल म्हणून वापर केल्याबद्दल भारतीय लष्कराविरुद्ध जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्राथमिक चौकशी अहवाल (FIR) दाखल केला आहे. 

एका काश्मिरी युवकाला लष्कराच्या जीपच्या पुढे बांधल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता. काश्मीरमध्ये जवानांवर स्थानिक युवक मोठ्या प्रमाणात दगडफेक करतात.  लष्कराच्या वाहनावर स्थानिक दगडफेक करत असल्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी जवानांनी एका युवकाला जीपच्या पुढे बांधल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, बडगाम जिल्ह्यातील बीरवा पोलिस ठाण्यात प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला आहे. श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीदरम्यान 9 एप्रिल रोजी हा व्हिडिओ काढण्यात आल्याचे मानले जाते. दक्षिण काश्मीरचे उपमहानिरीक्षक गुलाम हासन यांनी घटनेला दुजोरा देऊन हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले की, 13 एप्रिल रोजी याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी मागम हे याप्रकरणी तपास करीत आहेत. लष्कराच्या 53 राष्ट्रीय रायफल्स या तुकडीविरुद्ध FIR दाखल करण्यात आल्याचे स्थानिक वृत्तसंस्था KNS ने म्हटले आहे. 

दरम्यान, श्रीनगरमध्ये काही युवकांनी CRPF या भारतीय निमलष्करी दलातील एका जवानाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Jammu Kashmir police registers FIR against indian army