पाककडून जम्मूत तोफगोळ्यांचा मारा ; एक जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

जम्मूतील सीमेवर सातत्याने होणारा गोळीबार वेदनादायी आणि चिंताजनक आहे. आमच्या देशाने रमजानच्या काळात सुरक्षा दलांच्या मोहिमा थांबवून शांततेसाठी पुढाकार घेतला असताना पाकिस्तानने या पवित्र महिन्याविषयी कोणताही आदर दाखविला नाही. 
- मेहबूबा मुफ्ती, जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री 

 

जम्मू : भारताने रमजानच्या काळात शस्त्रसंधीचा निर्णय घेतला असताना, पाकिस्तानने मात्र शस्त्रसंधीचा भंग करत आज पहाटे सीमावर्ती भागातील चौक्‍या आणि गावांमध्ये केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात एक जवान हुतात्मा झाला. यामध्ये चार नागरिकांचाही मृत्यू झाला असून, अन्य 12 जण जखमी झाले. 

जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेवर सलग तिसऱ्या दिवशी तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शनिवार) जम्मू-काश्‍मीरच्या दौऱ्यावर जाणार असतानाच आज ही घटना घडली. 
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की पाकिस्तानी सैनिकांनी जम्मूच्या आर एस पुरा, बिश्‍नाह, अर्निया या भागांत रात्री उशिरा सुमारे एक वाजल्यापासून तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबार करण्यास सुरवात केली.

सीमेवर तैनात बीएसएफच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. मात्र यामध्ये कॉन्स्टेबल सीताराम उपाध्याय (वय 28) हुतात्मा झाले. जब्बोवाल सीमा चौकीवर रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारात ते गंभीर जखमी झाले होते. जम्मूच्या जीएमसी रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते झारखंडचया गिरीडीह येथील रहिवाशी होते. 

दरम्यान, आर एस पुरा आणि अर्निया सेक्‍टरमधील पाकिस्तानच्या गोळीबारात एका दांपत्यासह चार लोक ठार झाले आणि अन्य 12 जण जखमी झाल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त अरुण मनहास यांनी दिली.

Web Title: Jammu shot dead from Pakistan A young martyr