esakal | भाजपचा वाजपेयी कालीन स्तंभ - जसवंत सिंग
sakal

बोलून बातमी शोधा

Jaswant Singh & Atal Bihari.

पक्षाने तिकिट न दिल्याने 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी बारमेरहून भाजपच्या उमेदवाराविरूदध निवडणूक लढविली, म्हणून त्यांना 29 मार्च 2014 रोजी पक्षातून काढून टाकण्यात आले. तेव्हापासून ते एकाकी पडले.

भाजपचा वाजपेयी कालीन स्तंभ - जसवंत सिंग

sakal_logo
By
विजय नाईक

1980 साली भाजपची स्थापना झाली, त्यावेळी असलेल्या संस्थापकांपैकी ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांचे 27 सप्टेंबर रोजी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. तत्पूर्वी काही महिने ते जवळजवळ कोमात होते. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते निकटवर्ती होते. त्यांनी संरक्षण, अर्थ व परराष्ट्र मंत्रालय ही महत्वाची खाती संभाळली. 2012 मध्ये ते भाजपचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते भारतीय लष्करात मेजर होते. त्यांचा आवाज धीमा न धीरगंभीर होता. इंग्रजी व हिंदीवर प्रभुत्व व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे गहन अभ्यासक असल्याने परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची कामगिरी ध्यानात राहील. 

पक्षाने तिकिट न दिल्याने 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी बारमेरहून भाजपच्या उमेदवाराविरूदध निवडणूक लढविली, म्हणून त्यांना 29 मार्च 2014 रोजी पक्षातून काढून टाकण्यात आले. तेव्हापासून ते एकाकी पडले. मोदी पंतप्रधान झाल्यावर एकाकी पडलेल्या नेत्यात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी, य़शवंत सिन्हा व मुरली मनोहर जोशी, अरूण शौरी, जसवंत सिंग व के.एन.गोविंदाचार्य यांचा प्रामुख्याने समावेश होतो. 

पत्रकार म्हणून जसवंत सिंग यांच्याबरोबर अनेकदा भेटण्याचे प्रसंग आले. पण त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात वादग्रस्त ठरली ती, परराष्ट्र मंत्री असताना इंडियन एअर लाइन्सचे कंदाहारला झालेले अपहरण व त्यातील भारतीय प्रवाशांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी त्यांच्या बदल्यात जसवंत सिंग यांनी खास विमानाने कंदाहरला जाऊन पाकिस्तानी दहशतवाद्यांची केलेली सुटका. भारताच्या इतिहासातील हा पहिला प्रसंग होता, की परराष्ट्र मंत्री मौलाना मसूद अजहर, ओमर शेख, मुश्ताक अहमद झर्गर यांना अफगाणिस्तानात सुखरूप पोहोचवून 160 भारतीय प्रवाशांना मायदेशी आणण्यात आले. एक प्रकारे ही नामुष्की होती. कारण, सुटका झालेला मौलाना मसूद अजहर आजही पाकिस्तानमधून भारताविरूद्ध दहशवादी कारवाया करीत आहे. 

देशातील बातम्या वाचण्यासाठीे इथे क्लिक करा...

या संदर्भात जसवंत सिंग यांनी परतल्यावर पत्रकार परिषद घेतली. त्यात मी त्यांना म्हटले, की एज फ्ऑरेन मिनिस्टर, यू एस्कऑर्टेड टेररिस्ट्स. त्यावर ते चांगलेच संतापले व एस्कऑरटेड असा शब्द तुम्ही वापरताच कसा, असा सवाल त्यांनी केला. खास विमानाने परराष्ट्र मंत्र्याने दहशवाद्यांना घेऊन जाणे योग्य कसे, असे मी विचारता, भारतीय प्रवाशांना परत आणणे महत्वाचे होते, असे ते म्हणाले. परंतु वाजपेयी यांच्या कारकीर्दीत घडलेल्या एका प्रसंगाने पाकिस्तानी दहशवादी संघटनांना अधिक बळ मिळाले व त्यांच्या कारवायात आजपर्यंत खंड पडलेला नाही. इंडियन एअर लाइन्सच्या विमानाचे अपहरण झाल्यावर ते अमृतसर व दुबई या ठिकाणी उतरले असता, तेथे थांबविणे शक्य असूनही ते झाले नाही, ही मोठी चूक होय. 
 
दुसरा प्रसंग ते राज्यसभेत ते सत्तारूढ पक्षाचे प्रमुख नेते असतानाचा. त्यावेळी लालकृष्ण अडवानी नुकतेच पाकिस्तानाचा दौरा करून आले होते. त्याची देशात चर्चा  सुरू होती. त्या दरम्यान जसवंत सिंग यांनी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंगल्ज माता या देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी यात्रा काढण्याचे ठरविले. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली. मी परिषदेला उपस्थित होतो. जसवंत सिंग यांनी काही भक्तांसह तेथे यात्रेस जाणार असल्याचे घोषित केले. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानच्या पूर्ण विरोधात असल्याने ही भेट वादग्रस्त ठरणार यात दुमत नव्हते. जसवंत सिंह यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्याबाबत अधिक चौकशी करता असे कळले होते, की आरएसएसने त्यांना इशारा दिला होता, की यात्रा काढली, तर तुमचे राज्यसभेतील नेतेपद काढून घेण्यात येईल. 

विदेशातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

जसवंत सिंग पट्टीचे मुत्सद्दी होते. या संदर्भात साउथ ब्लाक- दिल्ली, शिष्टाईचे अंतरंग - या माझ्या पुस्तकात मी एक अत्यंत मनोरंजक प्रकरण लिहिले आहे,  त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करणे समयोचित ठरेल. मुत्सद्देगिरी करताना कधी कधी अचानाक आफत उभी राहाते. माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिग व अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री मॅडलीन ऑलब्राइट सप्टेंबर 2000 मध्ये वऑर्सा (पोलंड) येथे झालेल्या -कम्युनिटी ऑफ डेम्ऑक्रसीज- या सम्मेलनाला उपस्थित होते. त्यांच्यातील चर्चा संपल्यावर अन्य नेत्यांबरोबर या दोघांवरही अचानक बॅलेनृत्यात सहभागी होण्याची वेळ आली. पण, त्यामुळे भारत व अमेरिका निकट आले, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. उलट, अण्वस्त्र चाचण्या झाल्यामुळे माजी अध्यक्ष बिल क्लिंन्टन यांच्या कारकीर्दीत कटुता शिगेला पोहोचली होती. एनपीटी व सीटीबीटी च्या कक्षेत भारताला आणण्यासाठी जसवंत सिंग व अमेरिकेचे उप-परराष्ट्र मंत्री स्ट्रोब टॅलबट यांच्या दरम्यान गोपनीय चर्चेचं सत्र सुरू झालं, अन् दमछाक होईपर्यंत गुऱ्हाळ चालू राहिलं. अमेरिका, युरोप व आशिया या तीन खंडातील निरनिराळ्या शहरात या दोन नेत्यांच्या 14 फेऱ्या झाल्या. त्याचा आढावा टॅलबट यांनी -एन्गेजिंग इंडिया – डिप्लोमसी, डेमॉक्रसी अँड द बाँम्ब- या पुस्तकात घेतला आहे. त्यातील नाट्यमय प्रसंग- 

मनिला (फिलिपीन्स) येथे 26 व 27 जुलै रोजी झालेल्या -एशियन रिजनल फोरम-च्या पाचव्या बैठकीला जसवंत सिंग व ऑलब्राइट उपस्थित होते. समारोपाच्या भोजनाला येताना प्रत्येकाने वेगवेगळी वेषभूषा करण्याची प्रथा आहे. परराष्ट्र मंत्र्यांचा तो फॅशन शो च होता. रंगीबेरंगी टोप्या, कपडे, गिटार आदी वाद्य आणि मिळेल ते घेऊऩ मंत्रिमहोदय अवतरले. ते पाहताच उपस्थित राजदूत व राजकीय नेत्यांचा एक गलका सुरू झाला. जसवंत सिंग हे भारतीय सेनेतील शिस्तबद्ध माजी लेफ्टनन्ट कर्नल. हे सारं पाहून त्यांना तर धक्काच बसला. आणखी एक आफत होती. या प्रसंगी गाणं म्हणावं लागेल, या विचारानं ते चक्रावून गेले. तत्पूर्वी, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात दिल्लीतील हैद्राबाद हाऊसमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान जसवंत सिंग यांनी टॅलबट यांच्याकडे पूर्वानुभवाबाबत चौकशीही केली होती.

चार वर्षांपूर्वी बँक्ऑक येथे झालेल्या फोरमच्या बैठकीला परराष्ट्र मंत्री वॅरेन ख्रिस्तोफर यांची अनुपस्थिती टॅलबट यांना भरून काढावी लागली होती. टॅलबट म्हणतात, की माझ्या कारकीर्दीत कधीही पुसून टाकता न येणारा असा तो अपमान होता. ब्राडवे व ह्ऑलिवुडसाठी जगप्रसिद्ध असलेल्या महासत्तेच्या कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमाने या भुक्कड समारंभात कसाबसा दुसरा क्रमांक मिळविला. यापेक्षा अधिक फजिती झाली, ती दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्याची. मंचावर उभे राहून ते हार्मोनिका वाजवू लागले. पण, क्षणार्धात इतके काही घाबरले, की सारं सोडून प्रतिष्ठा राखण्यासाठी ते मटकन बसले. 

हेही वाचा - अध्यक्षीय लढतीत रंगत


या प्रसंगाची आठवण होऊन टॅलबट यांनी जसवंत सिंग यांना सल्ला दिला, की अशावेळी गांभीर्य टाळा व जे काही गाणार असाल, त्याचा मूळ हेतू जाहीर करण्याचंही टाळा. टॅलबट यांच्या सल्ल्याकडे अर्थातच जसवंत सिंग यांनी दुर्लक्ष केलं. त्या दिवशी सिंग चांगलेच मूडमध्ये होते. थोड्याच वेळात - वेस्ट साईड स्टोरी- या चित्रपटातील टोनी व मारिया यांच्या भूमिका अदा करीत परराष्ट्र मंत्री येवगेनी प्रिमाकोव्ह व मॅडलीन ऑलब्राइट यांनी युगुलगीत गायलं. उपस्थितांना ते भारी आवडलं. वर्षभरापूर्वी ऑलब्राइट यांनी एव्हिटा पेराँ (अर्जेंन्टिनाचे माजी अध्यक्ष ज्युऑं पेराँ यांची पत्नी व अभिनेत्री) ची भूमिका अदा करीत -डोन्ट क्राय फ्ऑर मी, आसियानीज,- हे प्रसिद्ध गीत सादर करून धमाल उडवून दिली होती. जसवंत सिंग यांची वेळ येताच मायक्रोफोन हाती घेत, सैनिकासारखे खांदे रुंदावत ते गाऊ लागले.

व्हाय सच ए फस ओव्हर सच ए फ्यु क्रॅकर्स इन द थार,
दे वेअर न्ऑट् एज लाऊड एज नेवाडा ऑर लाप नोर,
शरीफ टुक हिज वन्ज अँड जाँइन्ड द फन, 
एव्हिटा ल्ऑस्ट सम स्लीप, जियांग प्रऑलिफरेटेड इन द सन.

(यातील पहिल्या ओळीचा संदर्भ राजस्थानच्या थार वाळवंटातील अणुचाचणीशी, दुसऱ्या ओळीतील संदर्भ अमेरिकेने नेवाडा व चीनने लाप नोरच्या वाळवंटात केलेल्या अणुचाचण्यांशी, तिसऱ्या ओळीचा संदर्भ नवाझ शरीफ यांनी केलेल्या अणुचाचण्यांशी व चौथ्या ओळीचा संदर्भ एव्हिटा (मॅडेलिन ऑलब्राइट) व जियांगचा संबंध चीनचे अध्यक्ष जियांग झमीन यांच्याशी होता.

ते अत्यंत उपरोधिक होतं. आणखीही काही ओळी ते गायले. त्यातून द्यायचा तो इशारा जसवंत सिंग यांनी दिलाच. – जगाने ढोंगीपणा सोडून भारताकडे अण्वस्त्र आहे, याची जाणीव ठेवून वाटचाल केली पाहिजे- ऑलब्राटसह अन्य उपस्थितांना सिंग यांच्या गाण्याचे सूर भावले नाहीत, इति टॅलबट. या प्रसंगाला सिंग यांनी रणभूमी समजून लढवय्याची भूमिका बजावली, असंच म्हणावं लागेल. टॅलबट यांनी जसवंत सिंग यांचं वर्णन -सोल्जर डिप्लोमॅट- असं केलय. 

नंतर मनिलातील एका खाजगी भेटीत नाराजी दर्शवित मॅडेलीन ऑलब्राइट म्हणाल्या,- यू लाइड टु अस.- अणुचाचणीचं गुपित भारतानं अमेरिकेला देखील उघड केलं नव्हतं. त्याबाबत त्या नाराजी व्यक्त करीत होत्या. अमेरिकेचे राजदूत बिल रिचर्डसन व थ्ऑमस पिकरिंग जेव्हा जॉर्ज फर्नांडिस व माजी परराष्ट्र सचिव के. रघुनाथ यांना अण्वस्त्रचाचणीपूर्वी भेटले, तेव्हाही या दोघांनी त्यांना सुगावा लागू दिला नाही. 

जुलै 2000 मध्ये झालेल्या एशियन रिजनल फोरमच्या बैठकीला सिंग, ऑलब्राइट व टॅलबट  हे तिघेही उपस्थित होते. समारोपाच्या -थँक्स फ्ऑर द मेमरीज- या कार्यक्रमात ऑलब्राइट यांच्या नृत्य व गाण्याने पुन्हा धमाल केली. जसवंत सिंग यांच्याकडे पाहात त्या गाऊ लागल्या – आय अम सो ग्लॅड जसवंत इज हियर, इफ ही इज लुकिंग टू प्लीज मी – ही वुड साइन सीटीबीटी. पण जसवंत सिंग यांचा मूड नव्हता. ऑलब्राइट यांच्याकडे पाहात ते रुक्षपणे ते उत्तरले – आय हॅव हर्ड युवर साँग.

या जसवंती बाण्यानं बरंच काही साध्य केलं. त्यांना अर्थातच पाठिंबा होता, तो पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व ब्रजेश मिश्रा यांचा. दोन्ही करारांच्या संदर्भात अमेरिकेच्या दबावापुढे न झुकण्याचं धोरण त्यातून निर्विवादपणे स्पष्ट झालं.