जयललितांच्या घराचे होणार स्मारक 

वॉल्टर स्कॉट : सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 27 July 2020

दीपा यांनी सरकारच्या या कृतीला विरोध केला असून कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘वेद निलयम’ हे कायम घरच रहायला हवे, त्याचे स्मारक होऊ नये, अशी जयललिता यांची इच्छा होती.

चेन्नई - तमिळनाडूच्या राजकारणात तब्बल तीस वर्षे सत्तेचे एक महत्त्वाचे केंद्र राहिलेल्या ‘पोएस गार्डन’ येथील तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निवासस्थानाचा ताबा राज्य सरकारने घेतला आहे. जयललिता यांच्या वारसदारांबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे. ‘पोएस गार्डन’चे रुपांतर आता स्मारकात केले जाणार आहे. 

मद्रास उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी जयललिता यांचे भाचे दिपा आणि दीपक यांना कायदेशीर वारसदार घोषित करून ‘पोएस गार्डन’ या अलिशान भागातील जयललितांचा ‘वेद निलयम’ बंगल्यासह सर्व संपत्ती त्यांच्या मालकीची असल्याचे सांगितले होते. तसेच, येथील काही भागाचे रुपांतर मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून विकसीत करावे, असेही सुचविले होते. मात्र, सरकारने या बंगल्याचा ताबा स्मारक करण्यासाठी घेतला आहे. २०१६ मध्ये जयललिता यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सहकारी शशिकला नटराजन येथे रहात होत्या. मात्र, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी २०१७ पासून त्या तुरुंगात असल्याने हे निवासस्थान बंदच आहे. हे निवासस्थान लवकरच ‘तमिळनाडू पुरात्ची थलैवी डॉ. जयललिता मेमोरिअल फौंडेशन’च्या ताब्यात दिली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दीपा यांनी सरकारच्या या कृतीला विरोध केला असून कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘वेद निलयम’ हे कायम घरच रहायला हवे, त्याचे स्मारक होऊ नये, अशी जयललिता यांची इच्छा होती, असा दावा दीपा यांनी केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘वेद निलयम’चे मूल्य 
- २४,३२२ चौरस फूट : क्षेत्रफळ 
- २९.३३ कोटी : जमिनीची किंमत 
- ६७.९० कोटी : भरपाईसह एकूण किंमत 

यांचा संपत्तीवर दावा 
- दीपा आणि दीपक (जयललिता यांचे भाचे) : कायदेशीर वारसदार 
- प्राप्तीकर विभाग : ३६.८७ कोटी रुपये येणे असल्याचा दावा 

‘वेद निलयम’मधील वस्तू 
८३७६ : पुस्तके 
४.३७ किलो : वजनाचे सोन्याचे दागिने 
११ : टीव्ही सेट 
३८ : एअर कंडिशनर 
३९४ : स्मृतिचिन्हे 
८६७ : चांदीच्या वस्तू (६०१ किलो) 
१० : फ्रिज 
२९ : दूरध्वनी संच 
१०,४३८ : वस्त्रे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayalalithaas house will be a memorial