कर्नाटकात काँग्रेस-'जेडीएस' वाचविणार सरकार?

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जुलै 2019

कर्नाटकातील राजकीय संघर्षाला आणखी धार चढली असून, तेरा आमदारांच्या बंडांनंतर कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची (जेडीएस) आघाडी "डॅमेज कंट्रोल मोड'मध्ये गेली आहे.

बंगळूर : कर्नाटकातील राजकीय संघर्षाला आणखी धार चढली असून, तेरा आमदारांच्या बंडांनंतर कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची (जेडीएस) आघाडी "डॅमेज कंट्रोल मोड'मध्ये गेली आहे. या दोन्ही पक्षांकडून बंडखोरांची मनधरणी सुरू असून, भाजपनेही आधी विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेऊ द्या, मग आम्ही सत्ता स्थापनेचे बघू, असे वक्तव्य केले आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे आज सायंकाळी न्यूयॉर्कमधून थेट बंगळूरमध्ये दाखल होणार आहेत, त्यानंतर ते सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन चर्चा करतील. 

कर्नाटकमधील या राजकीय अस्थैर्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. सध्या मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात तळ ठोकलेले दहाही आमदार भाजपच्या गळाला लागल्याचे समजते. कर्नाटकमधील "ऑपरेशन कमळ'ची सूत्रे सध्या केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हाती असून, राज्य सरचिटणीस अरविंद लिम्बावली हेदेखील यात सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

बैठकांवर बैठका 

कर्नाटकमधील घडामोडींमुळे कॉंग्रेस नेतृत्व व्यथीत झाले असून, राज्याचे सिंचनमंत्री डी. के. शिवकुमार यांनी "जेडीएस'च्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये पक्षाचे संस्थापक एच. डी. देवेगौडादेखील सहभागी झाले होते. दोन्ही पक्ष या अस्थिरतेवर एकत्र बसून तोडगा काढतील, असा विश्‍वास शिवकुमार यांनी व्यक्त केला.

कॉंग्रेसचे कर्नाटक प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही आज ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, बी. के. हरिप्रसाद आणि अन्य नेत्यांचा समावेश होता. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकमधील या अस्थैर्याला सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी यांच्यातील संघर्ष कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. राज्यातील कॉंग्रेस नेतृत्वहीन बनली असून, इतरांवर आरोप करण्यापेक्षाही कॉंग्रेसने आधी त्यांचे घर सावरावे, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. 

दिवसभरात 

देवेगौडांची पुन्हा आमदारांशी खलबते 
येडियुराप्पांचेही भाजप आमदारांना निमंत्रण 
बंडखोर आमदारांशी संपर्काचे भाजपचे प्रयत्न 
सरकार सुरक्षित असल्याचा कॉंग्रेसचा दावा 
आणखी आमदार राजीनामा देण्याची शक्‍यता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JDS And Congress Thinking about how to Stable Kumarswamy Government