कमी जागा मिळूनही नितीश CM बनतील का? जेडीयूने दिलं उत्तर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

या निवडणुकीचा निकाल काहीही लागो मात्र, एनडीएच्या गोटात भाजप हाच मोठा भाऊ ठरला आहे.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरु आहे. निकाल सुस्पष्ट झाला नसला तरीही एनडीए आघाडीवर आहे. एनडीएने महागठबंधनहून अधिक जागा जिंकल्या आहेत. जर आणखी काही बदल झाले नाही तर एनडीएच निर्विवादपणे सत्तेत येईल. मात्र, असं असलं तरीही एक वेगळाच पेच उभा राहिला आहे. या निवडणुकीच्या निकालात पहिल्यापासूनच भाजपची आकडेवारी ही जेडीयूहून अधिक दिसत आहे. सध्या भाजपाने 72 जागांवर आघाडी घेतली आहे तर जेडीयूने 42 जागा जिंकल्या आहेत. 

या निवडणुकीचा निकाल काहीही लागो मात्र, एनडीएच्या गोटात भाजप हाच मोठा भाऊ ठरला आहे. आकड्यांनुसार भाजप हा मोठा पक्ष ठरल्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमारच राहतील की भाजपचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून ठरवला जाईल, अशी नविनच चर्चा सध्या होताना दिसतेय. 

हेही वाचा - Bihar Election: CM पदाची स्वयंघोषित दावेदार पुष्पम प्रिया दोन्ही जागांवर पिछाडीवर; EVM हॅकचा दावा
प्रश्न असा आहे की, भाजपा जर मोठा भाऊ ठरत असेल तर नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री बनायला हवं की त्यांनी नैतिकता दाखवून मागे हटायला हवं? जेडीयूचे प्रवक्ता अजय आलोक यांनी या प्रश्नावर उत्तर दिलंय. त्यांनी म्हटलं की एनडीएकडून नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील. भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी हे स्पष्ट केलंय की, मुख्यमंत्री हे नितीश कुमार हेच राहतील. जेडीयू नेत्याने म्हटलंय की, मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात जेडीयूच्या आणखी जागा निश्चितच वाढतील. एकदा स्पष्ट निकाल येऊदे मग याबाबत अधिक मत मांडता येईल, असं त्यांनी म्हटलंय. 

हेही वाचा - Bihar Election : आता भाजप मोठा भाऊ; लोजपाने केसाने कापला गळा?

या निवडणूकीत जेडीयूने 115 जागांवर निवडणुका लढवला आहेत. त्यातील सात जागा या हिंदुस्तानी आवाम मोर्च्याला दिल्या. तर भाजपाने 110 जागांवर निवडणुका लढवल्या आहेत. यातील 11 जागा या विकासशील इन्सान पार्टीला दिल्या आहेत. केंद्रात एनडीएसोबत असणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीने राज्यात भाजपशी फारकत घेऊन जेडीयू विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी नितीश कुमारांना विरोध करत त्यांच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्यामुळे जेडीयूची मते खाण्याचे काम लोजपाने केल्याचे म्हटलं जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jdu clarifies whether nitish kumar would become cm or not