जेडीयूला 12 तर भाजपला 18 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता; मोदींचा पत्ता कट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

या शपथविधीला राजदचे नेते तेजस्वी यादव हे अनुपस्थित राहणार आहेत. 

नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झालं आहे. आज ते सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. ही त्यांची सातवी मुख्यमंत्री पदाची शपथ असणार आहे. काल एनडीएच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र, आता त्यांच्या मंत्रीमंडळात कसे बदल होणारेत यावरच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. काल झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळाच्या विस्ताराव चर्चा झाली असल्याचे बोललं जातंय. यामध्ये 43 जागा जिंकलेल्या जेडीयूला 12 खाती मिळण्याची शक्यता आहे तर 74 जागा जिंकून मोठा भाऊ ठरलेल्या भाजपाला 18 खाती मिळण्याची शक्यता आहे. तर विकासशील इन्सान पार्टी आणि हिंदूस्तानी आवाम मोर्चाला प्रत्येकी एक खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा - 'काँग्रेसला उत्तरेच शोधायची नाहीयेत; आत्मपरिक्षणाची वेळही निघून गेलीय'

मंत्रीवाटपाचा खास फॉर्म्यूला

यामध्ये फेरबदल होऊन येत्या काही महिन्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही वर्तवली जातेय. एनडीएच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार, मंत्रीमंडळातील खाती ही जिंकलेल्या सात जागांमागे दोन खाती या फॉर्म्यूल्याने वितरीत करण्यात येणार आहेत. सरकारमधील मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या ही 36 च्या वर असू शकत नाही. कारण एकूण विधानसभेच्या 15 टक्के मंत्रीमंडळ असू शकतं. या गणितानुसार, 243 जागा असलेल्या विधानसभेत जास्तीतजास्त 36 जणांचे मंत्रीमंडळ असू शकतं.

सुशीलकुमार मोदींचा पत्ता कट; हे असू शकतात दोन उपमुख्यमंत्री

भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून तारकिशोर प्रसाद यांना निवडले गेले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार मोदी यांच्याऐवजी त्यांना उपमुख्यमंत्री केली जाण्याची शक्यता दाट आहे. यासोबतच इबीसी नेत्या रेणू देवी यांनाही उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदूस्तानी आवाम मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी हे स्वत: मंत्रीमंडळात येण्याऐवजी विधानपरिषदेवर असणाऱ्या आपल्या मुलाच्या म्हणजेच संतोष सुमन याच्या मंत्रीपदासाठी प्रयत्न करताहेत, असं म्हटलं जातंय. या शपथविधीला राजदचे नेते तेजस्वी यादव हे अनुपस्थित राहणार असल्याचं वृत्त एएनआयने दिले आहे. 

हेही वाचा - बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी सिमल्यात मजा करत होते, आरजेडी नेत्याचा आरोप

आज हे घेऊ शकतात मंत्रीपदाची शपथ
नितीश कुमार यांच्याशिवाय जेडीयूचे बिजेंद्र प्रसाद यादव, व्हिआयपीचे मुकेश साहनी, हम पार्टीचे संतोष सुमन मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपाचे तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी देखील मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. याशिवाय प्रेम कुमार आणि मंगल पांडेय हे भाजपचे आमदार शपथ घेऊ शकतात. तर जेडीयूचे नरेंद्र नारायण, श्रवण कुमार, महेश्वर हजारीदेखील शपथ घेऊ शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jdu may get 12 ministerial berths while bjp may get in18 bihar cabinet formation