जेईई ऍडव्हान्स पुन्हा होण्याची शक्‍यता; आयआयटी प्रवेशाची तिसरी संधी?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

येत्या १३ ऑक्‍टोबरला यूजीसीचे वरिष्ठ तसेच देशातील सर्व म्हणजे २३ आयआयटीच्या संचालकांसह सर्व संबंधितांची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर शिक्षण मंत्र्यांकडून प्रस्तावित जेईई ॲडव्हान्स परीक्षेबाबतचा निर्णय जाहीर होईल. 

नवी दिल्ली - अभियांत्रिकी, विशेषतः आयआयटीमधील प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेत यावर्षी कोविड महामारीमुळे जे विद्यार्थी परीक्षाच देऊ शकले नाहीत किंवा गुणवत्तेच्या कसोटीवर पात्र ठरले नाहीत त्यांना आणखी जेईई अॅडव्हान्स परीक्षा घेऊन तिसऱ्या वेळेस आणखी एक संधी देण्याचा विचार केंद्रीय शिक्षण मंत्रालय गंभीरपणे करत आहे. तसे झाले तर जेईई ॲडव्हान्स परीक्षा पुन्हा घेण्याची आयआयटीच्या इतिहासातील ती पहिली घटना ठरेल.

यासाठी येत्या १३ ऑक्‍टोबरला यूजीसीचे वरिष्ठ तसेच देशातील सर्व म्हणजे २३ आयआयटीच्या संचालकांसह सर्व संबंधितांची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर शिक्षण मंत्र्यांकडून प्रस्तावित जेईई ॲडव्हान्स परीक्षेबाबतचा निर्णय जाहीर होईल.

हे वाचा - खुशखबर : भारतीयांनी शोधला कोरोनावरील उपचार; ट्रायलला मिळाली परवानगी

शिक्षण मंत्रालयाने १३ ऑक्‍टोबरला संयुक्त प्रवेश मंडळाची (जॅब) बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत जेईई मेन्स व ॲडव्हान्स या पाठोपाठ यंदा तिसऱ्यांदा जेईई परीक्षा देण्याची आणखी एक संधी यावर्षी द्यावी काय, तसेच प्रस्तावित परीक्षेचे स्वरूप काय असावे यावर सविस्तर चर्चा होईल.

हे वाचा - मुकेश अंबानींची कंपनी बनवणार कोविड लस; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

आयआयटी व अभियांत्रिकी प्रवेशासाठी आतापावेतो जेईईच्या दोन परीक्षा होत असत. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे अभूतपूर्व परीस्थिती उद्भवली आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या मनस्थितीचा विचार करून त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात यावी असा जोरदार मतप्रवाह आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर २०२१ मध्ये जेईई ॲडव्हान्स परीक्षा पुन्हा घेण्यात येईल. कोरोनामुळे ज्यांना पहिल्या दोन्ही परीक्षांमध्ये कमी मार्क मिळाले किंवा जे परीक्षा देऊ शकले नाहीत तेच विद्यार्थी या तिसऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jee advance may be again students will get third chance admission