esakal | चारा घोटाळा : लालूप्रसाद यादव लवकरच तुरुंगाबाहेर, जामीन मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

लालूप्रसाद यादव

चारा घोटाळा : लालूप्रसाद लवकरच तुरुंगाबाहेर, जामीन मंजूर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशातील बहुचर्चित चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रांची उच्च न्यायालयाने काही अटींवर आरजेडीचे सुप्रिमो लालूप्रसाद यांना जामीन दिला आहे. वास्तविक या प्रकरणावर 9 एप्रिल रोजी सुनावणी होणार होती. परंतु, सीबीआयने आपला जबाब दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरु आहेत. दुमका कोषागारमधून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. कोरोना नियमांमुळे लालूप्रसाद यांना कारागृहातून बाहेर येण्यास काही काळ लागू शकतो. जामीन बाँड भरल्यानंतर त्यांना कारागृहातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होईल.

लालूप्रसाद यांना मोठा दिलासा

आपण अर्धी शिक्षा भोगली आहे, असे लालूप्रसाद यादव यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले होते. आपले वय खूप आहे. त्याचबरोबर विविध गंभीर आजाराने ग्रस्त आहोत, त्यामुळे जामीन दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणात अर्धी शिक्षा भोगलेल्या इतर दोषींना जामीन मिळाला आहे, असा उल्लेख ही त्यांनी आपल्या अर्जात केला होता. रांची उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. परंतु, जामीनासाठी त्यांना अनेकवेळा अर्ज दाखल करावा लागला होता.

दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरु

लालूप्रसाद यांना चाईबासा कोषागारशी निगडीत दोन प्रकरणात आणि देवघरच्या एक प्रकरणात यापूर्वीच जामीन मिळालेला आहे. दुमका कोषागारमधील अवैधरित्या पैसे काढण्याच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांना कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लालूप्रसाद यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरु आहेत. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच ती कारागृह अधिक्षकांना दिली जाईल, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. ही प्रक्रिया एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मृतदेहांबरोबर रॅली काढा, ममतादीदींची ऑडिओ क्लिप व्हायरल

न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर दंडाच्या रुपात 10 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना आपला पासपोर्टही जमा करावा लागणार आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना विदेशात जाता येणार नाही. आपला पत्ता आणि मोबाइल नंबरही बदलायचा नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा: कुंभमेळ्याची सांगता करा, पंतप्रधानांचे आवाहन ते अभिनेता विवेक यांचे निधन

loading image