पाच महिला कार्यकर्त्यांवर झारखंडमध्ये बलात्कार 

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

तस्करी आणि स्थलांतर या मुद्यांवर जनजागृती करण्यासाठी या महिलांचा समावेश असलेला अकरा जणांचा एक गट खुंटी जिल्ह्यातील चोचांग या गावामध्ये गेला होता. हा गट येथे पथनाट्य सादर करत असताना काही जण तेथे आले आणि बंदुकीचा धाक दाखवून पथनाट्य करणाऱ्यांना जंगलात नेले.

रांची : एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करणाऱ्या पाच महिलांवर बंदुकीचा धाक दाखवून किमान पाच जणांनी बलात्कार केल्याची घटना झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी वेगाने चौकशी सुरू करत आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

तस्करी आणि स्थलांतर या मुद्यांवर जनजागृती करण्यासाठी या महिलांचा समावेश असलेला अकरा जणांचा एक गट खुंटी जिल्ह्यातील चोचांग या गावामध्ये गेला होता. हा गट येथे पथनाट्य सादर करत असताना काही जण तेथे आले आणि बंदुकीचा धाक दाखवून पथनाट्य करणाऱ्यांना जंगलात नेले. जंगलातच गटातील महिलांवर बलात्कार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेबाबत पोलिसांना त्यांच्या गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने हालचाल केली. पोलिसांनी तपास करून आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल झाला असून, घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांचे तीन गट तयार करण्यात आले आहेत. 

खुंटीमधील घटनेची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानेही तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली असून, ही समिती झारखंडमध्ये जाऊन चौकशी करणार आहे. 

Web Title: Jharkhand rape against five women workers