JNU Attack:जेएनयू हिंसाचारात 'हे' पाच प्रश्न अनुत्तरीत!

टीम ई-सकाळ
सोमवार, 6 जानेवारी 2020

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज यासंदर्भात दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा करीत त्यांना विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे निर्देश दिले.

नवी दिल्ली JNU Attack: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) काही गुंडांनी धुडगूस घालत रविवारी विद्यार्थ्यांना केलेल्या जबर मारहाणीचे आज देशभर पडसाद उमटले. दिल्लीपासून गल्लीपर्यंत विद्यार्थी संघटनांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यांवर उतरत हिंसाचाराच्या घटनेचा निषेध केला. राज्यामध्येही डावे पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह पुरोगामी विचारांच्या संघटनांनी आंदोलन करीत दोषींवर कारवाईची मागणी केली. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेली विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोष हिने हा हल्ला पूर्वनियोजित होता, असा आरोप केला आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दखल करीत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशीला सुरुवात केली आहे. यातील काही हल्लेखोरांची ओळखदेखील पटली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे पाच प्रश्‍न अनुत्तरित

  • मुखवटाधारी हल्लेखोर कोण होते? 
  • या घटनेत पोलिसांची नेमकी भूमिका काय? 
  • हल्लेखोर हल्ल्यानंतर कॅम्पसबाहेर कसे गेले? 
  • हिंसाचारावेळी रस्त्यांवरील दिवे बंद का होते? 
  • डावे नेते, विचारवंतांनाच धुक्काबुक्की कशी झाली? 

आणखी वाचा - 'इतना भी मत डराओ, की डर ही निकल जाये'

पहिल्यांदाच असा हल्ला
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज यासंदर्भात दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा करीत त्यांना विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे निर्देश दिले. "जेएनयू'मधील विद्यार्थ्यांना झालेल्या या मारहाणीच्या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला. विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी "जेएनयू'मधील विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती व्यक्त केली. विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोष हिने हा हल्ला पूर्वनियोजित होता. मला हल्लेखोरांनी जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचे तिने म्हटले आहे. या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही विद्यापीठाचे रजिस्ट्रार, प्रोक्‍टर आणि रेक्‍टर यांच्याकडून खुलासा मागविला आहे. याच मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आज विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांची भेट घेतली. यापासून कुलगुरू जगदीशकुमार मात्र दोन हात दूरच पाहायला मिळाले. दिल्ली पोलिसांच्या सहआयुक्तांच्या नेतृत्वाखालील एक समिती या घटनेची सविस्तर चौकशी करीत आहे. विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेने कुलगुरू जगदीशकुमार यांची हकालपट्टी केली जावी, अशी मागणी केली आहे. मागील पन्नास वर्षांच्या विद्यापीठाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारचा हल्ला झाल्याचे शिक्षक संघटनेने म्हटले आहे. 

विद्यापीठातील हल्लेखोर आणि सुरक्षारक्षकांमध्ये लांगेबांधे असून, त्यांनी हिंसाचार थांबविण्यासाठी काहीही केले नाही. हा संघटित हल्ला होता. रा. स्व. संघाशी संबंधित तीन ते चार प्राध्यापक हे आमच्या चळवळीमध्ये फूट पाडण्यासाठी हिंसाचाराला चिथावणी देत आहेत. 
- आईशी घोष, अध्यक्षा, जेएनयूएसयू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jnu attack five unanswered questions information in marathi