दिल्ली पोलिसांवर कारवाई करावी

पीटीआय
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) वसतिगृहाच्या शुल्कवाढीविरोधात सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यास विद्यार्थी तयार नाही. शुल्कवाढ पूर्णपणे मागे घेण्याच्या मुद्यावर समितीने ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) शिष्टमंडळाने बुधवारी चर्चा केली.

‘जेएनयू’ शुल्कवाढ आंदोलन 
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) वसतिगृहाच्या शुल्कवाढीविरोधात सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यास विद्यार्थी तयार नाही. शुल्कवाढ पूर्णपणे मागे घेण्याच्या मुद्यावर समितीने ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) शिष्टमंडळाने बुधवारी चर्चा केली. मोर्चातील विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

जेएनयूएसयू’च्या प्रतिनिधींनी आज सकाळी उच्चस्तरिय समितीशी शुल्कवाढीविरोधात चर्चा केली. त्या वेळी विद्यार्थ्यांशी पुन्हा चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (ता. २२) विद्यापीठात येण्याचे आश्‍वासन समितीने दिले, अशी माहिती मनुष्यबळ विकास खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. समितीशी समाधानकारक चर्चा झाली नसल्याने रस्त्यावर निदर्शने सुरूच ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. शुल्कवाढीवर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी चर्चा करावी, अशी मागणीही आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.

विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. १८) संसदेवर काढलेला मोर्चा अडवून पोलिसांनी लाठीहल्ला केला. यात शशिभूषण पांडे हा दिव्यांग विद्यार्थी जखमी झाला. तो दृष्टिहीन आहे, असे सांगूनही पोलिसांनी त्याला मारहाण केली; तसेच पुरुष पोलिसांनी महिलांशी गैरवर्तन करीत धक्काबुक्की केली, असा आरोप विद्यार्थ्यांनी  केला आहे. 

प्रकरण उच्च न्यायालयात
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात ‘जेएनयू’ प्रशासनाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीबाहेर आंदोलन केले आहे, असे याचिकेत नमूद केले आहे. दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही शंका उपस्थित केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JNU fee hike movement Action should be taken against Delhi Police