'बिहारमध्ये पत्रकाराचं अपहरण करून हत्या', कुटुंबीयांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

buddhinath jha

'बिहारमध्ये पत्रकाराचं अपहरण करून हत्या', कुटुंबीयांचा आरोप

पाटना : पत्रकार तथा आरटीआय कार्यकर्ता असलेल्या एका तरुणाचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. आता त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला असून मेडिकल माफियांनी त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना बिहारमधील मधुबनी (Madhubani Bihar) जिल्ह्यात घडली असून त्याने काही बनावट रुग्णालयाचा पर्दाफाश केला होता.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : परिस्थिती नियंत्रणात, पण इंटरनेट सेवा तीन दिवस बंदच

बुद्धीनाथ झा, असे या पत्रकाराचे नाव असून ते स्थानिक न्यूज पोर्टलसाठी काम करत होते. त्याने काही बनावट रुग्णालयाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर अशा रुग्णालयाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. तसेच या रुग्णालयाच्या नावांसह एक फेसबुक पोस्ट देखील त्याने लिहिली होती. त्याच्या दोन दिवसानंतर त्याचे अपहरण करण्यात आले. तसेच घटनेचे वार्तांकन करताना देखील बुद्धीनाथला अनेक धमक्या येत होत्या. तसेच त्याला लाखो रुपये लाच घेण्याचे आमिष दाखवले गेले. पण, त्याच्या कामावर काहीच परिणाम झाला नाही.

बेनिपट्टीतील लोहिया चौकात त्याच्या घराजवळ बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो अखेरचा दिसला होता. शहर पोलिस ठाण्यापासून त्याचे घर ४०० मीटर अंतरावर आहे. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या घरातून निघाला आणि फोनवर बोलत मुख्य रस्त्यावर गेला. फोनवर बोलत असताना त्याच्या क्लिनिकमध्ये जातानाही तो या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. त्यानंतर गळ्यात पिवळा स्कार्फ घालून रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा घराबाहेर पडताना दिसला. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने स्थानिक बाजारपेठेत त्याला पाहिले. त्यानंतर तो गायब झाला. बुद्धीनाथ मंगळवारी रात्री उशिरा कामानिमित्त घराबाहेर गेला असावा असं कुटुंबीयांना वाटलं. पण, तो दुसरा दिवस संपूनही घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यांनी पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी मोबाईल ट्रॅक करून देखील बुद्धीनाथ कुठे आहे हे समजले नाही. शुक्रवारी १२ नोव्हेंबरला बुद्धीनाथचा चुलत भाऊ विकास याला बेतौन गावातून जाणाऱ्या महामार्गावर एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी बोटातील अंगठी आणि गळ्यातील सोन्याच्या चैनवरून त्याची ओळख पटविण्यात आली. कुटुंबीयांच्या संमतीने मृतदेह तत्काळ शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि त्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

या धक्कादायक घटनेने परिसरात प्रचंड संताप निर्माण झाला असून, त्याचे घर पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असताना त्याचे अपहरण कसे झाले? असा प्रश्न अनेकांनी विचारला. तसेच मेडीकल माफियांनी त्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

loading image
go to top