वाळू माफियाचे स्टिंग ऑपरेशन; पत्रकाराची ट्रकखाली चिरडून हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांसोबत साटंलोटं असल्याचा आरोप संदीप यांनी केला होता. त्यांनी या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशनही केले होते.

मध्यप्रदेश - येथील भिंद जिल्ह्यात एका पत्रकाराची अंगावर ट्रक घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप शर्मा असे या पत्रकाराचे नाव आहे. न्यूज वर्ल्ड चॅनल या वृत्तवाहिनीसाठी स्ट्रिंजर म्हणून ते काम करत होते. 

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांसोबत साटंलोटं असल्याचा आरोप संदीप यांनी केला होता. त्यांनी या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशनही केले होते. आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्यांनी पोलिस सुरक्षेची मागणीही एका पत्राद्वारे केली होती. अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

'कलम 304 अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यु झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी विशेष पोलिस पथकाची स्थापना करण्यात आली आहे.' अशी माहिती भिंदचे पोलिस महानिरीक्षक प्रशांत खरे यांनी दिली. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, अपघातानंतर घटनास्थळावरुन पळ काढलेल्या ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरु आहे.

या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 'पत्रकारांची सुरक्षा आमचं प्राधान्य आहे आणि गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई केली जाईल', असे म्हटले आहे. दरम्यान काँग्रेस नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 'पत्रकाराची भरदिवसा हत्या झाली आहे. सीबीआय चौकशीशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. मीडीया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि भाजपच्या शासनात तो चिरडला जात आहे', अशी टीकाही सिंधिया यांनी केली.

Web Title: a journalist investigatinh sand mafia crushed to death by truck in madhya pradesh