फूटपाथवर चहा विक्री ते फाईव्हस्टार शांग्रिला; साहित्यिकाचा प्रेरणादायी प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फूटपाथवर चहा विक्री ते फाईव्हस्टार शांग्रिला; साहित्यिकाचा प्रवास

फूटपाथवर चहा विक्री ते फाईव्हस्टार शांग्रिला; साहित्यिकाचा प्रवास

नवी दिल्ली : मराठी संस्कृती गंध घेऊन एक मराठी माणूस राजधानीत येतो. काम नाही म्हणून पदपथावर चहा विकता विकता हिंदी कादंबऱ्या लिहतो आणि देश-विदेशात नावलौकिक मिळवतो. आता या लक्ष्मणराव शिरभाते साहित्यिकाची दखल एका आंतरराष्ट्रीय साखळीतील पंचतारांकित हॉटेलने घेतली आहे. त्यांनी शिरभाते यांना चहाचे काऊंटर आणि त्यांच्या पुस्तकांसाठी स्टॉल उपलब्ध करून दिला आहे.

हेही वाचा: प्रथम तुला वंदितो! मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचा गजर

दिल्लीतील ‘आयटीओ’नजीक विष्णू दिगंबर मार्गावर हिंदी भवनाजवळ शिरभाते फूटपाथवर चहाची विक्री करतात. त्यांनी चहा विकता विकता ३५ पुस्तके लिहिली आहेत. लक्ष्मण राव यांच्या लेखन कार्याची ‘सकाळ’सह अनेक वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांनी दखल घेतली. त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून दिल्लीतील अशोक रोडवरील प्रसिद्ध शंग्रिला या पंचतारांकित हॉटेलने त्यांना चहाचे काउंटर आणि लेखन स्टॉल उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी कादंबरी, कथा, वैचारिक या साहित्य प्रकारात ३५ पुस्तके लिहिली असून, त्यातील २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘रामदास’, ‘नर्मदा’, ‘रेणु’ आदी त्यांच्या कादंबऱ्या तर ‘अहंकार’, ‘दृष्टिकोण’, ‘अभिव्यक्ति’ आदी त्यांचे कथासंग्रह प्रसिध्द आहेत. ‘द बॅरिस्टर’ हे महात्मा गांधी यांच्यावरील, तर ‘प्रधानमंत्री’ हे इंदिरा गांधी यांच्यावरील पुस्तकांसह त्यांचे वैचारिक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

हेही वाचा: अंकिता लोखंडेचं लवकरच लग्न? शाहीर शेखने गुपित उघडताच अंकिता म्हणाली...

शिरभाते हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील तळेगावचे (दशासर). अमरावीतील स्पिनिंग मिलमध्ये ते काम करीत. मिल बंद पडल्यानंतर ते भोपाळला गेले. मोलमजुरी केली. नंतर ते दिल्लीत स्थिरावले. मजुरी करीत असताना त्यांनी १९७७ मध्ये विष्णू दिगंबर मार्गावर पान विक्री सुरू केली. त्याच दरम्यान त्यांची रामदास ही कादंबरी प्रकाशित झाली. पुस्तके लिहिण्यासाठी लक्ष्मण राव नाव ते वापरू लागले. पुढे याच रस्त्यावर ते चहा विक्रीचा व्यवसाय करू लागले. लेखनकर्मही सुरूच ठेवले.

हेही वाचा: अंकिता लोखंडेचं लवकरच लग्न? शाहीर शेखने गुपित उघडताच अंकिता म्हणाली...

जीवनप्रवासात भेटलेली, वाचलेली माणसे आणि कडुगोड अनुभव त्यांनी पुस्तकांत आणले. आता त्यांच्या नावावर ३५ पुस्तकांची संपदा आहे. लक्ष्मण राव हे दिल्लीत आले त्यावेळी त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. पुढे त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी लिहिलेली पुस्तके कुणी प्रकाशित करीत नाही म्हणून त्यांनी प्रकाशन संस्थाही सुरू केली आहे. त्यांची काही पुस्तकांचे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे.

हेही वाचा: Ganesha Chaturthi 2021 : मानाच्या 5 गणपतींची विधीवत प्राणप्रतिष्ठापना

हिंदीतील श्रेष्ठ साहित्यिक गुलशन नंदा यांच्या साहित्यमुळे लेखन करण्यास प्रेरणा मिळाल्याचे सांगताना शेक्सपियरप्रमाणे उच्च दर्जाचे लेखन करता आले पाहिजे, अशी भावना सत्तर वर्षीय लक्ष्मण राव व्यक्त करतात. आता प्रसिद्ध हॉटेलने माझ्या कामाची दखल घेतली, त्यांनी मला त्यांच्या हॉटेलमध्ये चहाचा स्टॉल सुरू करून दिला, याचा मोठे समाधान आहे. ते मला दरमहा २२ हजार ५०० पगारही देत आहेत. ज्या विष्णू दिगंबर मार्गावरील पदपथाने ओळख दिली, त्यालाही मी विसरणार नाही. तेथेही आठवड्यातील काहीकाळ मी तेथे बसणार आहे आणि लेखनही सुरू ठेवणार आहे, असे लक्ष्मण राव यांनी सकाळला सांगितले.

टॅग्स :delhiLaxman Shirbhate