Ganesha Chaturthi 2021 : मानाच्या 5 गणपतींची विधीवत प्राणप्रतिष्ठापना

Ganesha Chaturthi 2021 : मानाच्या 5 गणपतींची विधीवत प्राणप्रतिष्ठापना

पुणे : उल्ल्हासदायी वातावरण, मोजक्या भाविकांची उपस्थिती, सनई चौघड्यांचे वादन आणि विधीवत पूजा अशा प्रसन्न वातावरणात शहरातील मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळांच्या बाप्पाची आज प्राणप्रतिष्ठापना झाली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या सर्व गणपती मंडळानी गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. भक्तांना गणेशाचे ऑनलाइन दर्शन घेता यावे यासाठीची सोय सर्व गणेश मंडळांनी केली आहे.

कसबा गणपती :

१८९३ साली स्थापन झालेल्या मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठा खासदार गिरीश बापट व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी झाली. त्याआधी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती पालखीतून उत्सव मंडपात आणण्यात आली. मंडळाच्या फेसबुक पेजवर लाइव्ह दर्शन घेण्याची व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली होती.

ऑनलाइन दर्शनसाठी

तांबडी जोगेश्वरी गणपती :

मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना वेदभवनचे प्राचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी करण्यात आली. सनई-चौघड्याच्या वादनात बप्पा विराजमान झाले. १८९३ साली या मंडळाची स्थापन करण्यात आली आहे.

ऑनलाइन दर्शनसाठी -

गुरुजी तालीम गणपती :

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे यंदा १३५ वे वर्ष आहे. १८८७ साली या मंडळाची स्थापन झाली आहे. गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजता झाली . यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने सामाजिक उपक्रमांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. उत्सव मूर्तीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. स्थिर पद्धतीने यावेळी ढोलवादन करण्यात आले.

ऑनलाइन दर्शनसाठी -

तुळशीबाग गणपती :

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा शहरातील मानाचा चौथा गणपती. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी करण्यात आली. मंदिराभोवती घंटी महालाची आकर्षण सजावट सरपाले बंधूनी साकारली आहे. गणेश याग मंत्रजागर असे धार्मिक विधींसह बाप्पांचे स्वागत करण्यात आले आहे. स्थिर पद्धतीने यावेळी ढोलवादन करण्यात आले.

ऑनलाइन दर्शनासाठी -

केसरीवाडा गणपती :

१९०१ साली स्थापन झालेला केसरी वाडा गणपती पुण्यातला मानाचा पाचवा गणपती आहे. केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने परंपरेनुसार पालखीतून केसरीवाड्यात मूर्ती आणण्यात आली गेली. केसरीचे विश्वस्त रोहित टिळक व त्यांच्या पत्नी प्रणिती टिळक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात सर्व धार्मिक विधी करण्यात आले. उत्सवादरम्यान काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑनलाइन दर्शनसाठी -

दगडूशेठ हलवाई गणपती :

दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या श्रींची सकाळी नऊ वाजून ४५ मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापना सोहळा, ‘श्रीं’चे दर्शन आणि ऋषिपंचमीनिमित्त होणारा अथर्वशीर्ष पठण सोहळा यंदा ऑनलाइन पद्धतीने घेतला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीचीही स्थापना मुख्य मंदिरातच करण्यात आली आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंदिरास आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सेक्सोफोन आणि मेलिडीका वाद्यांच्या सह्याने यावेळी गणपतीची गाणे सादर करण्यात आली.

ऑनलाइन दर्शनसाठी -

https://www.dagdushethganpati.com/

अखिल मंडई गणपती मंडळ :

साधी सजावट, सनई-चौघड्याचे वादन करीत विधीवत पद्धतीने अखिल मंडई गणपती मंडळाच्या श्रीची दुपारी बारा वाजता प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि त्यांच्या पत्नी मीना भोंडवे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. सूर्याच्या संकल्पनेवर आधारित आकर्षक फुलांची आरास मंदिरात करण्यात आली आहे. अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १२८ वे वर्ष आहे. न्यू गंधर्व बँडच्या पथकाने यावेळी बँड वादन केले.

ऑनलाइन दर्शनसाठी -

https://akhilmandaimandal.org

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट :

ट्रस्टच्या श्रींची गुरुजी तालीम मंडळांचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सनई चौघड्याच्या वादनामुळे निर्माण झालेल्या मंगलमयी वातावरणात हा सोहळा पार पडला. मंडळाने रंगीबेरंगी काचांच्या साहाय्याने आकर्षक अशी आरास बाप्पा भोवती केली आहे.

ऑनलाइन दर्शनसाठी

https://www.bhaurangari.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com