पंजाबमध्ये रावणाला PM मोदींचा मास्क, जेपी नड्डा राहुल गांधींवर संतापले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

जर एखादा पक्ष घृणास्पद कृत्ये करीत असेल तर तो कॉंग्रेस आहे. राजस्थानमध्ये एससी/एसटी समाजावर सर्वाधिक अत्याचार होत आहेत.

नवी दिल्ली- विजयादशमीनिमित्त पंजाबमध्ये रावणाच्या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा लावल्यामुळे भाजप आक्रमक झाली असून त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तर हे राहुल गांधींनी रचलेलं कुंभाड असल्याचा आरोप केला आहे. ही अत्यंत लाजीरवाणी घटना असली तरी हे अनपेक्षित नसल्याचे त्यांनी टि्वट करुन म्हटले आहे. 

नड्डा यांनी टि्वटमध्ये म्हटले की, पंजाबमध्ये पंतप्रधानांचा पुतळा जाळण्याच्या नाटकाचे राहुल गांधी यांनी दिग्दर्शन केले आहे. हे लाजीरवाणे असले तरी अनपेक्षित नाही. कारण नेहरु-गांधी घराण्याने कधीही पंतप्रधान पदाचा सन्मान केलेला नाही. हे 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या काळात पाहायला मिळाले होते. त्यांच्या सत्ताकाळात पंतप्रधानपद संस्थात्मकरित्या कमजोर करण्यात आले होते. 

हेही वाचा- कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला 3 वर्षांचा कारावास

जर एखादा पक्ष घृणास्पद कृत्ये करीत असेल तर तो कॉंग्रेस आहे. राजस्थानमध्ये एससी/एसटी समाजावर सर्वाधिक अत्याचार होत आहेत. राजस्थानबरोबर पंजाबमध्येही महिला असुरक्षित आहेत. पंजाबचे मंत्री तर शिष्यवृत्ती घोटाळा करत आहेत, असा आरोप त्यांनी आपल्या दुसऱ्या टि्वटमध्ये केला. 

हेही वाचा- भारतात 38 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला; हर्ड इम्युनिटीला सुरुवात?

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत काँग्रेस कधीही इतरांसमोर जाऊ शकत नाही. त्यांनी दशकानुदशके इतरांचे आवाज दाबण्याचे काम केलेले आहे. आम्ही आणीबाणीच्यावेळी याची झलक पाहिली आहे. त्यानंतर राजीव गांधी सरकारने माध्यमांचे स्वातंत्र्य कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुक्त प्रसारमाध्यमे काँग्रेसला अडचणीची वाटतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jp nadda attacks on congress rahul gandhi for burning PMs effigy in Punjab is shameful