काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यानेच दिला राजीनामा

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसअध्यक्ष पदाच्या शर्यतीती असणारे काँग्रेसचे महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला पण, त्याला यश आलं नाही. दरम्यान, काँग्रेसमध्ये सुरू असलेलं राजीनामा सत्र काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसअध्यक्ष पदाच्या शर्यतीती असणारे काँग्रेसचे महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पत्कराव्या लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण, त्यांचा राजीनामा अद्याप देखील स्वीकारला गेलेला नाही. लोकसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण, काँग्रेसला मात्र चांगलं यश मिळालं नाही.

मध्य प्रदेशमध्ये भाजपला धुळ चारत काँग्रेसची सत्ता आणण्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. गुना हा शिंदे घराण्याचा गड. पण, या ठिकाणावरून देखील ज्योतिरादित्य शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुना येथे झालेला पराभव हा राजघराण्याचा पहिलाच पराभव आहे. 4 वेळा गुनामधून खासदार असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पराभव हा चांगलाच जिव्हारी लागला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jyotiraditya Scindia resigns as National General Secretary of Congress