भारतातील राजकीय नेत्यांकडून अपेक्षाभंग 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

नवी दिल्ली : भारतात लक्षावधी मुलांची जनावरांपेक्षा कमी किमतीने खरेदी-विक्री होत असताना मानवी तस्करीविरोधी विधेयकावर राज्यसभेत चर्चा न करून राजकारण्यांनी लाखो बालकांचा अपेक्षाभंग केला असल्याची खंत नोबेल पारितोषिक विजेते समाजसेवक कैलास सत्यार्थी यांनी आज व्यक्त केली. 

नवी दिल्ली : भारतात लक्षावधी मुलांची जनावरांपेक्षा कमी किमतीने खरेदी-विक्री होत असताना मानवी तस्करीविरोधी विधेयकावर राज्यसभेत चर्चा न करून राजकारण्यांनी लाखो बालकांचा अपेक्षाभंग केला असल्याची खंत नोबेल पारितोषिक विजेते समाजसेवक कैलास सत्यार्थी यांनी आज व्यक्त केली. 

येथे आयोजित केलेल्या लालबहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानमालेत कैलास सत्यार्थी यांनी "सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत'या विषयावर व्याख्यान दिले. "लहान मुलांचे भविष्य हा अद्यापही राजकीय प्राधान्याचा मुद्दा नसून, ही वेदनादायी बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. मानवी तस्करीविरोधी विधेयकावर राज्यसभेत या वेळीही चर्चा झाली नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन किमान एक दिवस तरी बालसुरक्षा, शिक्षण आणि त्यांच्या भविष्यासमोरील आव्हानांवर चर्चा करावी. मात्र, लहान मुलांची गुरांप्रमाणे आणि गुरांपेक्षाही कमी किमतीत खरेदी-विक्री होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून राजकारण्यांनी लक्षावधी मुलांचा अपेक्षाभंग केला आहे,' असा संताप सत्यार्थी यांनी व्यक्त केला. 

हिवाळी अधिवेशनादरम्यान मानवी तस्करीविरोधी विधेयक यादीत असतानाही त्यावर चर्चा झाली नाही, अथवा ते मंजूरही झाले नाही. लोकसभेत मात्र ते गेल्याच वर्षी मंजूर झाले आहे. मानवी तस्करीच्या प्रकरणांची वेगाने सुनावणी करण्याची आणि कमी कालावधीत निकाल देण्याची तरतूद या विधेयकात आहे. 

केवळ घोषणा आणि आवेशपूर्ण भाषणांनी न्याय मिळत नाही, समाजही बदलत नाही. गेले काही दिवस केवळ राजकीय फायदा मिळविण्यासाठी संसदेचा वापर झाला. निष्पाप बालकांसमोर असलेल्या भल्या मोठ्या आव्हानांबाबत आपल्या लोकप्रतिनिधींना काहीही काळजी नसल्याचे दिसत आहे. 
- कैलास सत्यार्थी, नोबेल विजेते

Web Title: kailash satyarthi criticises Indian political leaders