कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असल्याचे वृत्त आहे. कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांनी मारेकऱ्यांना ओळखले आहे.

बेळगाव -  ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असल्याचे वृत्त आहे. कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांनी मारेकऱ्यांना ओळखले आहे. कलबुर्गी यांच्यावर गणेश मिस्कीनने गोळ्या झाडल्या, तर प्रवीण प्रकाश चतुर हा दुचाकी चालवत असल्याचे एसआयटी तपासात पुढे आले आहे. कर्नाटकातील एका इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त आज प्रसिद्ध केले आहे. 

कल्याणनगर धारवाड येथे ३० ऑगस्ट २०१५ ला कलबुर्गी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करण्यात येत आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांचा कलबुर्गी हत्या प्रकरणातही सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी केली. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. संशयित धारवाड येथील मध्यवर्ती कारागृहात आहेत. 

हत्यांसाठी दोन्ही दुचाकी चोरीच्या
प्रवीण आणि गणेश मिस्कीनने दुचाकीचा वापर केला असून, मेकॅनिक असलेल्या वासुदेव सूर्यवंशीने ती दुचाकी चोरली होती, असे स्पष्ट झाले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी दावणगेरेतून, तर कलबुर्गी यांच्या हत्येसाठी हुबळीतून दुचाकी चोरण्यात आली होती. हुबळी येथील सबअर्बन पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीच्या घटनेची नोंद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalburgi Wife Identifies Suspect