Breaking : कमलनाथ यांचा राजीनामा; मध्य प्रदेशातील राजकीय नाट्याची सांगता!

वृत्तसंस्था
Friday, 20 March 2020

माझ्या सरकारने पंधरा महिन्यांच्या कार्यकाळात केलेली लोककेंद्री विकासकामे भाजपला रुचली नसून त्यामुळेच त्यांनी सरकारच्या विरोधात षड्‌यंत्र रचले, असा आरोप कमलनाथ यांनी केला.

भोपाळ : मध्य प्रदेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज पदाचा राजीनामा दिला. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच कमलनाथ यांनी पद सोडले. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्याच्या विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून विश्वासदर्शक ठरावाला कमलनाथ यांच्या सरकारने सामोरे जावे, असा आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. विश्वासदर्शक ठरावापूर्वीच आज कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली. कॉंग्रेस पक्षाच्या २२ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार अडचणीत आले होते. 

राजीनामा पत्रात कमलनाथ यांनी म्हटले आहे की, माझ्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मी शुद्धतेचे राजकारण करत आलो असून, लोकशाही मूल्यांचे पालन करण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र मागील दोन आठवड्यांमध्ये लोकशाही मूल्यांना पायदळी तुडविणाऱ्या घटना घडल्या आहेत. 

- Corona Effect : ब्लॅक नाही, तर ब्लँक फ्रायडे!

नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देतानाच राज्याच्या विकासासाठी त्यांना सहकार्य करू असेही कमलनाथ यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. राज्यपालांकडे राजीनामा देण्यापूर्वी कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देत असल्याची घोषणा केली. 

राजीनामा स्वीकारला 

कमलनाथ यांनी दुपारी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली. मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला आहे. नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत कमलनाथ यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहावे, असे राज्यपालांनी सांगितले आहे, अशी माहिती राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबईसाठी मोठा निर्णय; वाचा देशात कोठे किती रुग्ण?

भाजपवर निशाणा 

मध्य प्रदेशातील राजकीय संकटासाठी कॉंग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य शिंदे हे जबाबदार असल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला. आपले सरकार पाडण्यासाठी भाजपकडून षड्‌यंत्र रचण्यात आले असून, त्यांनी लोकशाही मूल्यांचा खून केल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला. मी राजीनामा दिला असला तरी या पुढे नागरिकांच्या विकासाचे राजकारण मी करत राहणार असून, राजकारणात सदैव मी मूल्यांना सर्वोच्च स्थान दिले. 

- Coronavirus : आता 36 देशांतील नागरिकांना भारतात बंदी!

माझ्या सरकारने पंधरा महिन्यांच्या कार्यकाळात केलेली लोककेंद्री विकासकामे भाजपला रुचली नसून त्यामुळेच त्यांनी सरकारच्या विरोधात षड्‌यंत्र रचले, असा आरोप कमलनाथ यांनी केला. भाजपने कॉंग्रेसच्या २२ बंडखोर आमदारांना बंगळूरमध्ये कोंडून ठेवल्याचे संपूर्ण देशाने पाहिले. भाजपने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. माझ्या सरकारने केलेल्या विकासकामांचा भाजपने धसका घेतला होता, असेही ते म्हणाले. 

भाजपने ज्योतिरादित्य यांच्याशी संगनमत करून मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे सरकार आणि लोकशाहीचा खून केला आहे. 
- कमलनाथ, मध्य प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamal Nath resigns as CM of Madhya Pradesh hits out at BJP ahead of Floor Test