ट्विटमुळे वादात सापडलेल्या कंगनाला सुरक्षा कवच; मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या सूचना

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 7 September 2020

मुंबईचा उल्लेख पाक व्याप्त काश्मिर असा केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना राणावत यांच्यात ट्विटरच्या माध्यमातून शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळाले होते.

मुंबई संदर्भात वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला हिमाचल प्रदेश पोलिसांची सुरक्षा मिळणार आहे. कंगनाची बहिण आणि वडिलांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे यासंदर्भात विनंती केली होती. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. कंगना 9 सप्टेंबरला मुंबईला जाणार असून तिच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे तिला सुरक्षा द्यावी, अशी मागणी कंगनाच्या कुटुंबियांनी हिमाचल प्रदेशमधील सरकारकडे केली होती. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात कंगना वादग्रस्त वक्तव्य करत आहे. याप्रकरणात तिने मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख करुन रोष ओढावून घेतला होता.  

रशियाचा अमेरिकेच्या निवडणूकीतील हस्तक्षेप धोकादायक- कमला हॅरीस

कंगनाचे वडील आणि बहिण यांनी पोलिस सुरक्षा देण्यासंदर्भात पत्र लिहिल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी एएनआयशी बोलताना  दिली. यासंदर्भात राज्य पोलिसांना आदेश दिले असून तिला पोलिस सुरक्षा पुरवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हिमाचल प्रदेशच्या कंगनाच्या निवासस्थानाबाहेरही पोलिसांची सुरक्षा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कंगना राणावत 9 सप्टेंबरला हिमाचल प्रदेशातून महाराष्ट्राची राजधानी मुंबईत रवाना होणार आहे. यासंदर्भात तिने एक ट्विट देखील केले होते.   

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईचा उल्लेख पाक व्याप्त काश्मिर असा केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना राणावत यांच्यात ट्विटरच्या माध्यमातून शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळाले होते. कंगनासंदर्भात संजय राऊत यांनी अपशब्दही वापरले. यावरुनही वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर अपशब्दाच्या वापराबद्दल स्वत: माफी मागेन, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते. कंगनाने बॉलिवूडमधील डग्ज कनेक्शनसंदर्भात भांडाफोड करण्यासाठी हरियाणा किंवा हिमाचल पोलिसांनी सुरक्षा द्यावी, असे ट्विटही कंगनाने केले होते. मुंबई पोलिसांची सुरक्षा घेणार नसल्याचे सांगत तिने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिस यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut granted police by himachal pradesh cm after shiva sena controversy