'याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह', वरुण गांधी कंगनावर संतापले | Varun Gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varun Gandhi, Kangana Ranaut

'याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह', वरुण गांधी कंगनावर संतापले

sakal_logo
By
स्वाती वेमूल

पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना रणौतच्या Kangana Ranaut देशाच्या स्वातंत्र्याबद्दलच्या विधानावर भाजपचे खासदार वरुण गांधी Varun Gandhi यांनी टीका केली आहे. 'या विचाराला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह,' असा सवाल त्यांनी ट्विट करत उपस्थित केला. १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, असं विधान कंगनाने केलं. 'टाइम्स नाऊ'च्या समिट २०२१ मध्ये तिने केलेल्या या विधानावरून सोशल मीडियावर टिकाटिप्पणी होत आहे.

वरुण गांधी यांचं ट्विट-

'कधी महात्मा गांधीजींच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेंसह राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार.. या विचाराला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह,' असा सवाल वरुण गांधी यांनी केला आहे.

हेही वाचा: "इतिहासाचं ज्ञान कमी असल्याने अशा लज्जास्पद चुका होऊ शकतात"

नेमकं काय म्हणाली कंगना?

"सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहित होतं की रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानीवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं," असं कंगना 'टाइम्स नाऊ'च्या समिटमध्ये म्हणाली. कंगनाच्या उत्तरावर निवेदिका नाविका कुमार म्हणाल्या, "म्हणूनच सगळे तुला म्हणतात की तू भगवा आहेस." त्यावर कंगना म्हणते, "आता या विधानानंतर माझ्यावर आणखी १० केसेस होणार आहेत." "आता तू दिल्लीतच आहेस", असं नाविका यांनी म्हटल्यावर कंगनाने प्रत्युत्तर देत म्हटलं, "जायचं तर घरीच आहे ना." कंगनाच्या या विधानावर उपस्थितांपैकी काहींनी टाळ्यांचा वर्षाव केला. मात्र तिच्यावर सोशल मीडियावर टीकासुद्धा होऊ लागली आहे.

loading image
go to top