विकास दुबे कनेक्शन : पोलिसांनी जप्त केल्या तीन अलिशान कार, एक कार भाजप नेत्याची

टीम ई-सकाळ
सोमवार, 6 जुलै 2020

30 जून रोजी अजयच्या मेव्हण्याचा विवाह झाला. यावेळी संपूर्ण कुटुंबिय या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या समारंभामध्ये  विकास दुबेही उपस्थिती होता. यासंदर्भातील एक फोटो पोलिसांच्या हाती लागला आहे.  

कानपूर : उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर केलेल्या गोळीबाराच्या घटनेनं देशाला हादरवून सोडले होते. यात एका अधिकाऱ्यासह 8 पोलिस हुतात्मा झाले. पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेल्या  विकास दुबेचा पोलिस शोध घेत आहेत. त्याची माहिती देणाऱ्याला लाखाचे बक्षीस देण्याची घोषणाही पोलिसांनी केली आहे. विकास दुबेच्या प्रकरणात आता एका भाजप नेत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विकास दुबेच्या शोधमोहिमेदरम्यान पोलिस पथकाने तीन अलिशान कार जप्त केल्या आहेत. तिन्ही गाड्यांवर नंबर प्लेट नव्हत्या. पोलिस चौकशीमध्ये या तिन्ही गाड्या ब्रह्मानगरचा रहिवासी असलेल्या जय वापरत असल्याचे समोर आले आहे. यातील एक कार भाजपचे नेते प्रमोद विश्वकर्मा यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.

त्या रात्री विकास दुबेनं तासाभरात 50 हत्यारबंद गुंड आणले, अन्...

विकास दुबेसंदर्भातील प्रकरणात जयला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर त्याने या  तीन कार नंबर प्लेट काढून विजय नगर येथील रहिवासी असलेल्या अविनाश याच्या घरासमोर लावल्या होत्या. काकादेव ठाण्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही कार हा ब्रह्मानगरचा रहिवासी असलेल्या जय वाजपेयीच वापरतो. पण त्यातील एकही कार त्याच्या नावावर नाही. यातील  ऑडी भाजपचे नेता प्रमोद विश्वकर्मा यांच्या नावावर आहे.  फॉर्च्यूनर चकरपुर निवासी राहुल आणि वर्ना अशोक नगर निवासी कपिल सिंह यांच्या नावे आहे.

'राजकारणानं उद्धवस्त केलं, त्याला मारून टाका'; विकास दुबेच्या आईची भावना

जयने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मोठा भाऊ अजयची चौबेपुरमधील दिलीप नगर ही सासरवाडी आहे. 30 जून रोजी अजयच्या मेव्हण्याचा विवाह झाला. यावेळी संपूर्ण कुटुंबिय या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या समारंभामध्ये  विकास दुबेही उपस्थिती होता. यासंदर्भातील एक फोटो पोलिसांच्या हाती लागला आहे.  प्रमोद विश्वकर्मा यांनी आपल्या नावावर असलेल्या कारसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. जय हा माझा मित्र आहे. त्याचा बँक सिव्हिल स्कोर चांगला नसल्यामुळे अलिशान कार माझ्या नावे खरेदी केली होती, असे त्यांनी म्हटले आहे. इतर कार जयने दुसऱ्याच्या नावे का खरेदी केल्या यासंदर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kanpur Vikas Dubey Connection One of the three luxury cars by the BJP leader