फ्रेशर्स पार्टीनंतर कर्नाटकात 66 मेडिकल स्टुडंटना कोरोनाची लागण ; वसतिगृह सील : Bangalore | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Medical College Student,covid

महाविद्यालयाने अलीकडेच प्रथम वर्षाच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले होते.

फ्रेशर्स पार्टीनंतर कर्नाटकात 66 मेडिकल स्टुडंटना कोरोनाची लागण

बंगळूर : राज्यात कोविड (Covid 19 )रुग्णाची संख्या घटत असतानाच धारवाड (Dharwad)येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Medical College Student)६६ विद्यार्थ्यांना कोविड-१९ ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आणखी काही विद्यार्थ्यांचा अहवाल प्रतीक्षेत असल्याने या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बाधित विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत असून, वसतिगृह सीलबंद केले आहे.

धारवाडजवळील एसडीएम मेडिकल कॉलेजमध्ये (SDM Medical College)गुरुवारी ६६ विद्यार्थी आणि काही कर्मचाऱ्यांची चाचणी सकारात्मक आली. जिल्हा प्रशासनाने महाविद्यालयाचे वसतिगृह कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे. बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये सौम्य लक्षणे असून, त्यांच्यावर सत्तूरजवळील महाविद्यालयाच्या आवारातील वसतिगृहात उपचार सुरू आहेत. सर्व बाधित विद्यार्थ्यांना वसतिगृहातील एका ब्लॉकमध्ये हलवण्यात आले आहे.

हेही वाचा: Vidhan Parishad Election : 415 मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द

चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या ब्लॉकमध्ये हलविले आहे. संपूर्ण वसतिगृह सील केले असून, हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी धारवाड जिल्हा आरोग्य अधिकारी तैनात केले आहेत. वसतिगृहात कोणी प्रवेश करू नये किंवा वसतिगृहातून कोणी बाहेर जाऊ नये, यावर देखरेख ठेवण्यासाठी परिसरात पोलिस तैनात आहेत.

धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील (Nitesh Patil)यांनी सांगितले की, एकूण २७० विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली असून, ६६ जणांची गुरुवारी सकाळपर्यंत चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.

फ्रेशर्स पार्टीनंतर पसरला संसर्ग?

महाविद्यालयाने अलीकडेच प्रथम वर्षाच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले होते. त्यानंतर संसर्ग पसरला असावा. इतर राज्यांतील विद्यार्थीही वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असून, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग कसा पसरला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे, परंतु जिल्हा आरोग्य विभाग गुरुवारी त्याची उलटतपासणी करणार आहे.

loading image
go to top