कर्नाटकात पैसे घेऊन मंत्रिपदांचे वाटप; भाजप आमदाराचाच आरोप

टीम ई सकाळ
Wednesday, 13 January 2021

कर्नाटकात येडीयुरप्पांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजपमध्ये  नाराजीनाट्य सुरु झालं आहे. भाजपच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आहे.

बेंगळुरू - कर्नाटकात येडीयुरप्पांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजपमध्ये  नाराजीनाट्य सुरु झालं आहे. भाजपच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. आमदार बसनगौडा यतनाल यांनी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, येडीयुरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी. जे कोणी ब्लॅकमेल करतात किंवा पैसे देतात त्यांना मंत्रिपद दिलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. यासाठी सीडी आणि सीडी प्लस पैसे असा कोटा असल्याचंही बसनगौडा यतनाल यांनी म्हटलं. 

बसनगौडा यतनाल यांनी जोरदार हल्लाबोल केला असून त्यांनी म्हटलं की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्यात आलं आहे. तर भाजपचे आणखी एक आमदार कालाकप्पा बंदी यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी या मंत्रिमंडळ विस्ताराने खूश नाही याकडे पक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. 

हे वाचा  - मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्यसभेच्या माजी खासदाराला अटक; ईडीची कारवाई

मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तारात आज 7 नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. येडीयुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींना मंत्र्यांची यादी सोपवली होती. पक्षश्रेष्ठींनी अनेक दिवस त्यावर चर्चा केल्यानंतर शिक्कामोर्तब केलं होतं. आता मंत्र्यांच्या शपथविधीनंतर नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे कर्नाटक भाजपचे अनेक नेते नाराज आहेत.

हे वाचा - बॅनर्जींच्या माता सीतेवरील वक्तव्याने संतांमध्ये आक्रोश; शीर कापणाऱ्याला 5 कोटींचे बक्षीस

कर्नाटकात मुख्यमंत्र्यांसह 27 मंत्री आहेत. आता त्यात नवीन 7 मत्र्यांचा समावेश झाला आहे .यामध्ये मुरुगेश निरानी, उमेश कट्टी, अंगारा, योगेश्वर, अरविंद लिंबावली, एमटीबी नागराज, शंकर आर यांचा समावेश आहे. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या योगेश्वर यांच्यावर भाजपच्या विश्वनाथ यांनी टीका केली. त्यांनी म्हटलं की, योगेश्वर यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी रिअल इस्टेटमध्ये फसवणूक केली असून ते मंत्री झाले आहेत. आम्ही आमदारकीचा राजीनामा दिला तेव्हा ते बॅगा उचलून जात होते. आता ते मंत्री आहेत असंही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karnataka cabinet expansion bjp mla disappoint on-cm-bs-yediyurappa