सीमाप्रश्न : अजित पवारांचं वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबलं

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र राज्यची स्थापना करणे हे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण निर्धार करुया, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चत आहे. त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर केलेल्या वक्तव्याचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी निषेध केला आहे. तसेच त्यांनी म्हटलंय की, अजित पवारांच्या अशा वक्तव्याने सीमा प्रश्नाची आग आणखीनच भडकेल. 

बी. एस. एडीयुरप्पा हे वार्ताहरांशी बोलत होते. तेंव्हा त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. बेळगावीतील मराठी लोक हे आमच्यासाठी, आमच्या राज्यासाठी कन्नडिगांसारखेच आहेत. मराठी लोकांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून येथे महामंडळे स्थापन केली आहेत. महाजन आयोगाचा अहवाल हा अंतिम आहे, हे माहिती असताना त्यांनी याप्रकारचे विधान केले आहे, ज्याचा मी निषेध करतो. 

हेही वाचा - नेताजींच्या जयंती दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; ममता दीदींचे PM मोदींना पत्र
अजित पवार यांनी काल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बोलत होते. तेंव्हा त्यांनी म्हटलं होतं की, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र राज्यची स्थापना करणे हेच बाळासाहेबांचे स्वप्न होतं. आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण निर्धार करुया. 

पुढे येडीयुरप्पा यांनी म्हटलंय की, बेळगावी विश्व कन्नड संमेलन  हे 2011 मध्ये झाले होते. या संमेलनात मराठी लोकदेखील मोठ्या संख्येने सामिल झाले होते. असं असतानाही अजित पवार हे आणखी आग लावण्याचं काम का करत आहेत? त्यांचं हे वक्तव्य निषेधार्ह असून आम्ही त्याचा निषेध करतो आहे. याप्रकारची वक्तव्ये त्यांनी इथून पुढे करु नयेत. 

हेही वाचा - अखेर ट्विटरचा माफीनामा; चूक सुधारण्यासाठी मागितला वेळ

अजित पवार यांच्या या वक्तव्यावरुन वातावरण गरम झालं आहे. त्यांच्या वक्तव्याला येडीयुरप्पा यांच्याकडून आलेल्या प्रत्युत्तरामुळे सीमावाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. पवारांच्या या वक्तव्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा निषेध केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karnataka cm yeddyurappa condemns ajit pawar statement over united Maharashtra