'ऑपरेशन कमळ' कोमेजले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

बंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा "ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे लागले. कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांचे मन वळविण्यात कॉंग्रेसला यश आल्याने भाजपचा ड्रामा दोन दिवसांतच संपला आहे. त्यामुळे "ऑपरेशन कमळ'चे सूत्रधार म्हणून ओळखण्यात येत असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा आता दिल्लीहून परत येण्याच्या मार्गावर आहेत. 

बंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा "ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे लागले. कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांचे मन वळविण्यात कॉंग्रेसला यश आल्याने भाजपचा ड्रामा दोन दिवसांतच संपला आहे. त्यामुळे "ऑपरेशन कमळ'चे सूत्रधार म्हणून ओळखण्यात येत असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा आता दिल्लीहून परत येण्याच्या मार्गावर आहेत. 

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचा फायदा घेण्यासाठी भाजपने "ऑपरेशन कमळ'ची योजना आखली होती. कॉंग्रेसच्या आमदारांना सत्ता व संपत्तीचे आमिष दाखवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपने कट रचल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यातच मंगळवारी (ता.15) दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा मागे घेतल्याने भाजपचे मिशन फत्ते होते की काय, अशी चर्चा होती. दोन दिवसांत असंतुष्ट आमदारांचे राजीनामे घेऊन सरकार स्थापन करण्याची तयारीही भाजपने चालविली होती. परंतु, कॉंग्रेसने त्यांचा डाव पुन्हा एकदा उधळून लावला. 

सिद्धरामय्यांना यश 
गेल्या दोन दिवसांपासून कॉंग्रेसला हात दाखवून अज्ञातस्थळी निघून गेलेले बळ्ळारीच्या हगरीबोम्मनहळ्ळीचे आमदार भीमा नायक, कंप्लीचे आमदार जी. गणेश, आमरेगौडा बय्यापूर थेट बंगळूरला परत आले. त्यामुळे भाजपच्या योजनेतील हवाच गेली. भीमा नायक व जी. गणेश "ऑपरेशन कमळ'च्या जाळ्यात अडकले होते. बळ्ळारी ग्रामीणचे आमदार बी. नागेंद्र यांनी त्यांना कॉंग्रेसविरुद्ध भडकावून भाजपच्या गोटात नेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे ते कोणाच्याच संपर्कात न येता अज्ञातस्थळी गेले होते. परंतु, माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांना त्यांचे मन वळविण्यात यश आले. 

अद्याप मुंबईत मुक्काम 
दोघा अपक्ष आमदारांसह सहा आमदार अद्यापही मुंबईत आहेत. माजी मंत्री रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, चिंचोळीचे डॉ. उमेश जाधव, बळ्ळारीचे बी. नागेंद्र, मस्कीचे प्रतापगौड पाटील यांचा त्यामध्ये समावेश आहे. यापैकी प्रतापगौड पाटील यांचे धोरण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. रमेश जारकीहोळी यांनी आपला राजकीय निर्धार सोडून दिला आहे. या सर्व गोष्टींमुळे "ऑपरेशन कमळ' मागे पडल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, हे सर्व आमदार अद्याप मुंबईत आहेत. 

आमदारांना 60 कोटींचे आमिष 
कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांना खेचण्यात अपयश येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. तुमकूर ग्रामीणमधील आमदार शिवलिंगेगौडा यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आरसीकेरीचे आमदार गौरी शंकर यांना माजी मुख्यमंत्री जगदिश शेट्टर यांनी मंगळवारी सायंकाळी फोन करून 60 कोटी रुपये व मंत्रिपद देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप केला. 60 कोटीच काय 500 कोटी दिले, तरी आम्ही पक्ष सोडणार नसल्याचा संदेश शेट्टर यांना दिल्याचे ते म्हणाले.

Web Title: Karnataka Congress BJP MLA Politics Government