सीमा भागातील विवादित ८६५ गावांच्या परिपत्रकात बदलाची गरज

अमोल नागराळे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

दहा महिन्यांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात निपाणी, कागवाड, मुडलगी या तीन नवीन तालुक्‍यांची निर्मिती झाली आहे. परिणामी, महाराष्ट्र शासनाने देखील नव्या तालुका रचनेनुसार परिपत्रकात बदल करण्याची आवश्‍यकता आहे. बदल न झाल्यास भविष्यात महाराष्ट्रातील सेवा, सुविधा, सवलतींपासून सीमाभागातील मराठी भाषिक उमेदवार वंचित राहण्याचा धोका उद्‌भवू शकतो.

महाराष्ट्र शासनाने कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांवर दावा सांगून या गावांचे जिल्हा व तालुकावर परिपत्रक १० जुलै २००८ मध्ये प्रसिद्ध केले आहे. ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवरील नियुक्तीसह अन्य लाभासाठी हे परिपत्रक आहे. पण दहा महिन्यांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात निपाणी, कागवाड, मुडलगी या तीन नवीन तालुक्‍यांची निर्मिती झाली आहे. परिणामी, महाराष्ट्र शासनाने देखील नव्या तालुका रचनेनुसार परिपत्रकात बदल करण्याची आवश्‍यकता आहे. बदल न झाल्यास भविष्यात महाराष्ट्रातील सेवा, सुविधा, सवलतींपासून सीमाभागातील मराठी भाषिक उमेदवार वंचित राहण्याचा धोका उद्‌भवू शकतो.

महाराष्ट्र शासन राज्यपालांच्या आदेशानुसार व शासनाच्या उप-सचिवांच्या स्वाक्षरीने १० जुलै २००८ मध्ये कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवारांच्या लाभासाठी परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. परिपत्रकानुसार सेवा प्रवेश नियमांच्या प्रारुपामध्ये महाराष्ट्रात किमान वास्तव्याची अट अंतर्भूत नाही. शिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातींमध्ये देखील अशी अट नसते. ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारांनी सेवा भरती नियमातील सर्व अटींची पूर्तता केल्यास महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांच्या नियुक्तीसाठी अर्ज करण्यासह गुणानुक्रमे निवडीसाठी ते पात्र ठरतात. शिवाय सेवा प्रवेश नियमात महाराष्ट्रात सतत १५ वर्षे वास्तव्य आहे किंवा नाही, याची छाननी करताना संबंधित उमेदवाराचे ८६५ गावांतील १५ वर्षांचे वास्तव्य विचारात घेतले जाईल, असे परिपत्रकात म्हटले आहे. पण त्यासाठी ८६५ गावांतील रहिवासी दाखला सादर करणे बंधनकारक आहे.

परिपत्रकात जिल्हा व तालुकावार ८६५ गावांची विभागणी झालेली आहे. बेळगाव जिल्ह्यातील ३८५, कारवारमधील २९९, तर बिदर जिल्ह्यातील १८१ गावांचा समावेश आहे. दहा महिन्यांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात अथणी, कागवाड व मुडलगी या तीन नवीन तालुक्‍यांच्या निर्मितीमुळे काही गावांचे तालुके बदलले आहेत. या बदलाची दुरुस्ती महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात होणे आवश्‍यक आहे.

महाराष्ट्राच्या परिपत्रकात अथणी तालुक्‍यातील ९ गावांचा समावेश आहे. आता कागवाड नवीन तालुका झाल्याने ९ पैकी ३ गावे कागवाड तालुक्‍याला जोडली आहेत. चिक्कोडी तालुक्‍यातील ४८ गावांचा समावेश आहे. सध्या  निपाणी हा नवीन तालुका झाल्याने ४८ पैकी तब्बल ३८ गावे निपाणी तालुक्‍यात समाविष्ट झाली आहेत. 

असे हवे परिपत्रक
निपाणी तालुका
आडी, अक्कोळ, बारवाड, बेनाडी, भिवशी, हंचिनाळ, जत्राट, बुदिहाळ, कसनाळ, कोडणी, कुर्ली, लखनापूर, मांगूर, अंमलझरी, पडलिहाळ, सौंदलगा, सिद्‌नाळ, भाटनांगनूर, गोंदुकुप्पी, हदनाळ, मत्तीवडे, शेंडूर, शिरगुप्पी, सुळगाव, यरनाळ, बुदलमुख, कुन्नूर, माणकापूर, तवंदी, पांगिर-बी, नांगनूर, यमगर्णी, गवाण, कोगनोळी, ममदापूर, हुन्नरगी, कारदगा, निपाणी.

चिक्कोडी तालुका
पांगिर-ए, पट्टणकुडी, चिखलव्हाळ, पीरवाडी, रामपूर, वाळकी, खडकलाट, नवलिहाळ, शिरगाव, गिरगाव

अथणी तालुका
शिरुर, पांडेगाव, संबरगी, बमनाळ, जंबगी, अरळीहट्टी

 कागवाड तालुका
लोकूर, मंगसुळी, उगारखुर्द

दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी उमेदवारांवर अन्याय होऊ नये, याची दक्षता घेऊन महाराष्ट्र शासनाने परिपत्रकात आवश्‍यक ते बदल करावेत. नव्या तालुका रचनेनुसार दाखले, कागदपत्रे सध्याच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासन ग्राह्य धरणार नाही. याची खबरदारी आवश्‍यक आहे.
- प्रा. सागर परीट,
देवचंद कॉलेज, अर्जुननगर

नव्या तालुका निर्मितीनुसार महाराष्ट्र शासनाने कर्नाटकातील ८६५ गावांच्या परिपत्रकात बदल करण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात येथील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवा, सुविधा, लाभापासून वंचित राहावे लागेल.
- बंडोपंत पाटील, 

मत्तीवडे, ता. निपाणी

Web Title: Karnataka Maharashtra Border Issue