कर्नाटकच्या सहकारमंत्र्यांचे निधन

यूएनआय
बुधवार, 4 जानेवारी 2017

गुंडलपेठ मतदारसंघातून निवडून आलेले प्रसाद हे सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदावर होते. त्यांनी यापूर्वी पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच तीन वेळा त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागली होती

चिकमंगळुरू - कर्नाटकचे सहकारमंत्री एच. एस. महादेव प्रसाद (वय 58) यांचे आज हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. प्रसाद हे एका कार्यक्रमानिमित्त कोप्पा गावात आले होते. येथील विश्रामगृहावर ते मुक्कामास होते. दरम्यान, झोपेत अचानक त्यांची हृदयक्रिया बंद पडली. त्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा ही बाब समोर आली.

त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले. गुंडलपेठ मतदारसंघातून निवडून आलेले प्रसाद हे सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदावर होते. त्यांनी यापूर्वी पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच तीन वेळा त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागली होती.

Web Title: Karnataka Minister dies due to Heart Attack