गोव्याबरोबरील पाणीवाटपावरुन कर्नाटकात आज राज्यव्यापी बंद

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जानेवारी 2018

आज बंद असल्याने सरकारी कार्यालये व शाळा बंद राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगळूरमधील विविध आयटी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना सुटी घेण्याचे वा घरुनच काम करण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकमधील राज्य कर्मचारी संघटनेने या बंदास सक्रिय पाठिंबा दिला आहे

बंगळूर - गोवा राज्याबरोबर महादायी नदीच्या वाटपावरुन सध्या सुरु असलेल्या वादासंदर्भात केंद्र सरकारकडून कर्नाटककडे "जाणीवपूर्वक दुर्लक्ष' केले जात असल्याचा आरोप करत येथील काही कन्नड व शेतकरी संघटनांनी आज (गुरुवार) राज्य बंदाचे आवाहन केले आहे.

महादायी नदीवर असलेल्या कलसा-बांदुरी या जलप्रकल्पामधून 7.56 अब्ज घनफूट पाणी मिळावे, अशी कर्नाटकमधील या संघटनांची मागणी आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) हा बंद राजकीय हेतुने प्रेरित असल्याची टीका केली आहे.

आज बंद असल्याने सरकारी कार्यालये व शाळा बंद राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगळूरमधील विविध आयटी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना सुटी घेण्याचे वा घरुनच काम करण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकमधील राज्य कर्मचारी संघटनेने या बंदास सक्रिय पाठिंबा दिला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांचा या बंदाला छुपा पाठिंबा असल्याची टीका भाजपचे येथील मुख्य नेते बी सी येडयुरप्पा यांनी केली आहे. ""राज्यव्यापी बंद पुकारण्याची काय गरज आहे? केवळ बाधित क्षेत्रात बंद पुरेसा झाला असता. म्हैसुरमध्येही बंद पुकारण्याचे काय करण होते? परंतु सिद्धारामय्या हे जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करत आहेत. याआधी कुठल्याही मुख्यमंत्त्रयाने असे वर्तन केल्याचे पाहिले नाही,'' असे येडयुरप्पा म्हणाले.

Web Title: karnataka strike goa narendra modi india