काँग्रेसकडून जेडीएसला पाठिंब्याची ऑफर; भाजपला धोबीपछाड?

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

भाजपने नुकतेच मणिपूरमध्ये अशा प्रकारची खेळी केली होती. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पक्षांशी युती करत सत्ता स्थापन केली होती. गोव्यातही काँग्रेसला अशीच खेळी करून सत्तेपासून दूर ठेवले होते. 

बंगळूर - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप शंभरहून अधिक जागा जिंकून मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी काँग्रेसने जनता दल (सेक्युलर) (जेडीएस) सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

आज (मंगळवार) जाहीर झालेल्या निवडणुक निकालांत भाजपने 106 जागा जिंकून मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे. सत्ता स्थापनेसाठी 112 आकडा गाठण्याची गरज असून, भाजपला अद्याप सहा जागा आवश्यक आहेत. तर, काँग्रेसने 73 जागा मिळविल्या असून, जेडीएसकडे 41 जागा आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती झाल्यास सत्ता स्थापनेसाठी आवश्यक 112 जागांचा आकडा ते पार करू शकतात. त्यामुळे एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यास काँग्रेसची काही हरकत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृत निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे.

भाजपने नुकतेच मणिपूरमध्ये अशा प्रकारची खेळी केली होती. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पक्षांशी युती करत सत्ता स्थापन केली होती. गोव्यातही काँग्रेसला अशीच खेळी करून सत्तेपासून दूर ठेवले होते. आता कर्नाटकमध्ये अशी खेळी करण्याची संधी काँग्रेसला चालून आली आहे. याबाबत अद्याप काही अधिकृत निर्णय झालेला नाही.

Web Title: #Karnatakaverdict Congress offers to support JD(S) to form government with HD Kumaraswamy as CM say sources