
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
कासगंज - उत्तर प्रदेशमधील कासगंज जिल्ह्यात मंगळवारी पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता तर पोलिस उप निरिक्षक जखमी अवस्थेत आढळला होता. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. यावेळी झालेल्या एन्काउंटरमध्ये एक आरोपी ठार झाला आहे.
कासगंजमधील सिढपुरा इथल्या नगला धीमर गावात दारुचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला होता. तेव्हा दारु माफियांनी पोलिसांवरच हल्ला केला. यातील पोलिस उप निरिक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्याला दारु माफियांनी पळवून नेलं होतं. दोघांपैकी एकाचा मृतदेह तर एकजण गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता.
हे वाचा - उत्तराखंडमधील मृतांची संख्या ३१ वर; बोगद्यांमधील कामगारांचा शोध सुरू
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Kasganj: Man accused of killing a police personnel yesterday shot dead in a police encounter; another accused in the case absconding pic.twitter.com/xfwSO6iY5o
— ANI UP (@ANINewsUP) February 10, 2021
बुधवारी सकाळी एन्काउंटर झाल्यानंतर एसपी मनोज सोनकर यांनी सांगितलं की, अनेक पोलिसांची पथके सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. यावेळी काली नदीच्या खोऱ्यात आरोपींशी चकमक झाली. यामध्ये गोळी लागून मुख्य आरोपी मोती धीमरचा भाऊ एलगार जखमी झाला. त्याचे इतर सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. जखमीं झालेल्या आरोपीला उपचारासाठी नेण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हे वाचा - नवरीचा व्हायरल व्हिडिओ तर ट्रेलर होता; पिक्चर अभी बाकी है!
नगला धीमर गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारुचा व्यवसाय सुरु होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंर मंगळवारी गावात छापा टाकण्यासाठी पोलिसांचं पथक पोहोचलं होतं. याची कुणकुण लागलेल्या दारु माफियांनी तेव्हा पोलिसांनाच घेरलं आणि उपनिरिक्षकासह कर्मचारी देवेंद्र यांचे अपहरण केले. तेव्हा इतर पोलिसांना काही कळण्याआधीच माफियांच्या गुंडांनी पोलिस उप निरिक्षक अशोक आणि पोलिस कर्मचारी देवेंद्र यांना पळवून नेलं. शोध मोहिम सुरु असताना एका शेतात अशोक जखमी अवस्थेत आढळले तर दुसरीकडे पोलिस कर्मचारी देवेंद्र यांचा मृतदेह आढळला.