उत्तराखंडमधील मृतांची संख्या ३१ वर; बोगद्यांमधील कामगारांचा शोध सुरू

पीटीआय
Wednesday, 10 February 2021

तपोवन येथील ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यात अडकून पडलेल्या ३० कामगारांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून अनेक बचाव पथके रात्रंदिवस गाळ उपसण्याचे काम करत आहेत.

डेहराडून/ जोशीमठ - उत्तराखंडमधील जलप्रकोपात मरण पावलेल्यांची संख्या ३१ वर पोचली असून आज आणखी पाचजणांचे मृतदेह  यंत्रणेच्या हाती लागले. तपोवन येथील ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यात अडकून पडलेल्या ३० कामगारांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून अनेक बचाव पथके रात्रंदिवस गाळ उपसण्याचे काम करत आहेत. जसजसा घड्याळीचा काटा पुढे जाऊ लागला आहे तसतशी यंत्रणेची धाकधूक देखील वाढली आहे. या बोगद्यातील आणखी बराच गाळ उपसण्याचे काम बाकी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली

आणखी बेपत्ता असलेल्या १७५ कामगारांचाही शोध घेतला जात असून त्यासाठी बोगद्यातील गाळ वेगाने उपसण्याचे काम सुरू आहे. आज रैणी खेड्यातील ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. नंदादेवी हिमनगाचा कडा तुटल्याने रविवारी राज्यात जलप्रलयासारखी स्थिती निर्माण झाली होती. अलकनंदाच्या उपनद्यांना महापूर आल्याने याचा नदीच्या काठावरील गावांना मोठा फटका बसला होता. 

हे वाचा - नवरीचा व्हायरल व्हिडिओ तर ट्रेलर होता; पिक्चर अभी बाकी है!

 बेपत्ता झालेल्यांमध्ये मोठ्या संख्येने कामगारांचा समावेश असून ते तपोवन- विष्णुगड प्रकल्प आणि ऋषी गंगा जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणांवर काम करत होते. सध्या बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये स्थानिक कामगार आणि खेडूत यांचाही समावेश आहे. भारत- तिबेट पोलिस पथक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्याच्या आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान मदत आणि बचाव कार्यामध्ये सहभागी झाले आहेत. ज्या बोगद्यामध्ये हे कामगार अडकून पडले आहेत तो बारा फूट उंच आणि अडीच किलोमीटर लांब आहे. सध्या या बोगद्यातील चिखल बाहेर काढण्याचे काम सुरू असून आतापर्यंत १२० मीटरपर्यंतचा गाळ काढण्यात यंत्रणेला यश आले आहे, असे आयटीबीपीचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी सांगितले. सध्या जरी या बोगद्यातून कोणताही प्रतिसाद मिळत नसला तरीसुद्धा आतील लोक जिवंत असतील अशी आशा पांडे यांनी व्यक्त केली. या पुरामुळे मालारी येथील पूल देखील वाहून गेला असून येथील गावकऱ्यांचा मुख्य भूभागाशी असलेला संपर्क तुटला असल्याने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून  स्थानिकांना खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जात आहे. येथील स्थानिकांना आज शंभर रेशन किटचे देखील वाटप करण्यात आले.

ईडी लागली पत्रकारांच्या मागे; न्यूज क्लिकच्या ऑफिसवर छापा

या गावांना फटका
रैणी पल्ली, पांग, लता, सुराईतहोता, सुकी, 
भालगाव, तोल्मा, फागरासू, लाँग सेगडी, गाहार, भानगयूल, जुवागावाड आणि जुग्जू या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आज हवाई पाहणी देखील केली. जोशीमठ येथील रुग्णालयामध्ये काही जखमी कामगारांना दाखल करण्यात आले असून रावत यांनी आज त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. बोगद्यामध्ये अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यावर यंत्रणेचा भर असल्याचे रावत म्हणाले.

हे वाचा - Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhand floods updates Death toll rises to 31

Tags
टॉपिकस
Topic Tags: