अभिमानास्पद! मराठमोळ्या अधिकाऱ्यामुळे उजळून निघालं गाव; अंधारात जगत होते गावकरी

टीम ई सकाळ
Tuesday, 19 January 2021

दोन हजार वस्तीच्या गावात विजेमुळे घराघरांतील बल्ब प्रज्वलित झाले तेव्हा सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नव्हता.

श्रीनगर - भारतातील प्रत्येक गावात सोयी सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्यापही अशी काही गावे आहेत जी विकास आणि मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. भारताचं नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये अजुनही काही गावांमध्ये वीज आणि रस्ते नाहीत. त्यांना या सोयी पुरवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. डोडा जिल्ह्यातील गणौरी गावात पहिल्यांदाच वीज पोहोचली आहे. 

महाराष्ट्रातील अधिकारी सागर डोईफोडे यांच्या पुढाकारामुळे गणौरी टंटा गावात विजेचे आगमन झाले. गेल्या महिन्यात प्रशासनाच्या आढावा बैठकीत डोईफोडे यांना ही माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सूत्रे फिरविली. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही विजेचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश दिले होते. यासाठी संबंधित विभागाला एका महिन्याचे लक्ष्य देण्यात आले होते. डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली ते १५ दिवसांतच पूर्णत्वास नेण्यात आले.

हे वाचा - धक्कादायक! चीनने भारतात वसवलंय गाव; सॅटेलाइट फोटो आले समोर

काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे विजेचे खांब बसविणे आणि तारा टाकण्याचे काम आव्हानात्मक ठरले होते. यानंतरही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिद्द सोडली नाही. सोमवारी सुमारे दोन हजार वस्तीच्या गावात विजेमुळे घराघरांतील बल्ब प्रज्वलित झाले तेव्हा सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नव्हता.

गावात वीज पोहचल्यानंतर गावकऱ्यांनी सांगितलं की, आतापर्यंत कधीच गावात वीज पोहोचली नव्हती. रात्र झाली की लोक घरी जायचे. सगळं आयुष्य मेणबत्ती किंवा दिव्याच्या उजेडात काढलं. आता गावात वीज पोहचली आहे. रविवारी रात्रीपासून सगळं गाव झगमगत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kashmir first-time-light-in-doda-village-after-independence