
हिमवृष्टीमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प पडलेली असताना दवाखान्यात निधन झालेल्या एका काश्मीर पंडितांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेणे अशक्य झाले होते.
श्रीनगर - हिमवृष्टीमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प पडलेली असताना दवाखान्यात निधन झालेल्या एका काश्मीर पंडितांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेणे अशक्य झाले होते. अशावेळी शोपियॉंतील स्थानिक मुस्लिमांनी खांदा देत सुमारे आठ ते दहा किलोमीटर वाटचाल करत तो मृतदेह गावी पोचवल्याचा प्रकार नुकताच घडला.
काश्मीर पंडित भास्कर नाथ (वय ६०) यांच्यावर श्रीनगर येथे एसकेआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह शोपियॉं जिल्ह्यातील पारगोची गावात न्यायचा होता. त्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली. मात्र बर्फ असल्याने शोपियॉंतून गावाकडे रुग्णवाहिका नेणे अशक्य झाले.
*Video By Reshi Irshad*
Amid #snowfall, local #Muslims walk on foot to shoulder the dead body of a Pandit stuck in an ambulance in South #Kashmir #Shopian District pic.twitter.com/52ijnRlgIV
— Govind singh (@Govindsmedia) January 23, 2021
रुग्णवाहिका चालकाने शहरातील कुटुंबीयास फोन केला. त्यांनी स्थानिक मुस्लिमांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार काही जण रुग्णवाहिकेकडे आले आणि त्यांनी पंडितांचा मृतदेह खांद्यावर घेत पारगोची गावी नेला. हिमवृष्टीतही अंत्यसंस्कार करणे कठीण बाब होती. परंतु हिंदू पद्धतीनुसार स्थानिकांनी सोय करत भास्कर नाथ यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात मुलगा आणि दोन मुली आहे.
हे वाचा - एक फेब्रुवारीपासून पॅसेंजर, लोकलसह सर्व ट्रेन रुळावर? जाणून घ्या खरं काय
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात मोजकीच काश्मीर पंडितांची घरे आहेत. इथले लोक एकमेकांसोबत एका कुटुंबासारखे राहतात आणि समाजाचा एक भाग आहेत. भास्कर यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
काश्मीरमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरु आहे. या परिस्थितीत अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवांसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये भारतीय लष्कराचे जवान एका बाळाला जन्म दिलेल्या महिलेला स्ट्रेचरवरून नेत असताना दिसतं. बर्फवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था नसल्यानं महिलेला जवानांनी अॅम्ब्युलन्सपर्यंत पोहोचवलं.