बर्फवृष्टीमुळे काश्मीरातील शेतकरी आर्थिक संकटात; कर्जमाफीसाठी राजू शेट्टी आग्रही

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 16 November 2019

सफरचंदाची वाहतूक करणारे ट्रक सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरच अडवून ठेवण्यात आल्याने श्रीनगर-जम्मू, श्रीनगर-लडाख या महामार्गावर दहा ते पंधरा हजार ट्रकची रांग लागली आहे.

नवी दिल्ली : काश्‍मीरमध्ये अतिबर्फवृष्टीमुळे सफरचंद, केशर, अक्रोड आणि बदाम या पिकांचे झालेले नुकसान ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांची शिखर संघटना असलेल्या 'अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती'ने शनिवारी (ता.16) केली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संघटनेच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी काश्‍मीरमध्ये जाऊन या हानीची पाहणी केली होती. तसेच, केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन काश्‍मिरी शेतकऱ्यांना दिले होते. शिष्टमंडळात माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वराज आंदोलनाचे योगेंद्र यादव, शेतकरी नेते व्ही. एम. सिंग, प्रेमसिंग गेहलावत, सत्यवानसिंह आदी सात जणांचा समावेश होता. 

शरद पवार म्हणतात, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार...

शेट्टी यांनी सांगितले की, जम्मू-काश्‍मीरचे 370 वे कलम रद्द होऊन तो केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना काश्‍मीर खोऱ्यात झालेल्या बिगरमोसमी बर्फवृष्टीमुळे तेथील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या हानीचा सामना करणाऱ्या सफरचंद, बदाम, अक्रोड, केशर उत्पादकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून तातडीने आर्थिक मदत केली जावी. याखेरीज या उत्पादकांना कर्जमाफी द्यावी, अशीही मागणी या नेत्यांनी केली. 

श्रीनगरमध्ये काश्‍मिरी शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर या शिष्टमंडळाने नायब राज्यपालांचीही भेट घेतली होती. काश्‍मीरमधील संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकारे देशाच्या ऊर्वरित भागातील सामाजिक आणि राजकीय संघटनांपैकी असलेल्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांचा हा पहिलाच दौरा होता.

'105 किंकाळ्या' आणि वेड्यांचा घोडेबाजार; शिवसेनेचा वार

या शिष्टमंडळाने श्रीनगरमधील गंदरबल भागात स्थानिक शेतकऱ्यांची भेट घेतली. काश्‍मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर, तसेच बदाम उत्पादकांच्या संघटनांचे सुमारे 70 ते 80 प्रतिनिधी या वेळी आले होते. बर्फवृष्टीच्या थैमानामुळे झालेल्या हानीचे गाऱ्हाणे या प्रतिनिधींनी शिष्टमंडळापुढे मांडल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

ते म्हणाले, की पानगळ झाल्यानंतर बर्फ पडतो; परंतु निसर्गचक्र बदलल्याने या वेळी पानगळीला सहा आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची 20 ते 25 वर्षे जुनी झाडे मोडून पडली आहेत. सफरचंदाचे झाड वाढण्यासाठी बारा वर्षांचा कालावधी लागतो. हीच परिस्थिती बदाम आणि अक्रोडाच्या झाडांबाबत झाली असून, केशराच्या शेतीचीही वाताहत झाली आहे. 

- राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर; पाहा अशी मिळणार मदत​

महामार्गावर ट्रकची रांग 

सफरचंदाची वाहतूक करणारे ट्रक सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरच अडवून ठेवण्यात आल्याने श्रीनगर-जम्मू, श्रीनगर-लडाख या महामार्गावर दहा ते पंधरा हजार ट्रकची रांग लागली आहे. उत्पादकांना लहान लहान वाहनांद्वारे दुर्गम भागातून सफरचंद आणावी लागत आहेत, तर नाशवंत माल साठविण्यासाठी शीतगृहे नाहीत, असे शेट्टी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kashmiri Farmers in financial crisis due to snowfall said Raju Shetty