
माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा कलम 370 लागू करण्याची मागणी केली होती.
श्रीनगर- माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा कलम 370 लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काश्मिरचे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत, ना त्यांना भारतीय म्हणून घेण्याची काही इच्छा आहे. काश्मिरी लोकांना वाटतं की त्यांच्यावर चीनने राज्य करावं, असं ते म्हणाले आहेत.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, 'काश्मिरमध्ये कोणी स्वत:ला भारतीय म्हणून घेणारा व्यक्ती भेटला तर मला आश्चर्य वाटेल. तुम्ही जा आणि तेथील कोणाशीही चर्चा करा. ते स्वत:ला भारतीय म्हणणार नाहीत आणि पाकिस्तानीही म्हणणार नाहीत. मोदी सरकारने मागील 5 ऑगस्ट रोजी जे केलं, तो काश्मिरवरील शेवटचा आघात होता.'
चिमुकलीची कमाल! गुगलला केली स्कॅम अॅप्स शोधून देण्यात मदत
काश्मिरी लोकांनी गांधींच्या भारताला निवडलं होतं
काश्मिरच्या लोकांना आता सरकारवर काहीही विश्वास राहिला नाही. विभाजनाच्यावेळी पाकिस्तानसोबत जाणे खोऱ्यातील लोकांसाठी सोपं होतं, पण त्यांनी गांधी यांच्या भारताला निवडलं. त्यांना आता मोदींच्या भारतात रहावं लागत आहे, असंही ते म्हणालेत.
नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेता फारुक अब्दुल्ला पुढे म्हणाले की, आज चीन दुसऱ्या बाजूने आत येत आहे. जर तुम्ही काश्मिरी लोकांसोबत बोलाल, तेव्हा अनेक लोक म्हणतील की चीन भारतात यावा. त्यांना माहीत आहे, की चीनने मुस्लीमांसोबत काय केलं आहे. तरीही त्यांना तसं वाटत आहे. मी या वक्तव्याबाबत गंभीर नाही, पण जे म्हणत आहे ते लोकांना ऐकायला आवडणार नाही.
गुगल डूडलद्वारे भारताच्या 'या' जलतरणपटूचा गौरव, वयाच्या पाचव्या...
प्रत्येक गल्लीत एके-47 घेऊन सैनिक उभा आहे
खोऱ्याच्या प्रत्येक गल्लीत हातात एके-47 घेऊन सैनिक उभा आहे. मग काश्मिरमध्ये स्वातंत्र्य कुठे आहे. खोऱ्यात भारताबद्दल काही बोललं तर तिथे ऐकणारं कोणीही नाही, असं अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, यापूर्वी अब्दुल्ला यांनी लोकसभेत जम्मू-काश्मिरला कलम 370 लागू करण्याची मागणी केली होती. कलम पुन्हा लागू केल्यासच काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित होईल, असं ते म्हणाले होते.
(edited by- kartik pujari)