कोण हिंदू, कोण मुस्लिम, त्या चिमुकलीला याची जाणीव तरी होती का?

योगेश कानगुडे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

देशात दोन वेगवेगळ्या राज्यात बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यावरून संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुमत आहे तर जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर सत्तेत आहे. दोन्ही राज्यांतल्या जनतेला परिवर्तन हवे होते. नवी पारदर्शक व्यवस्था हवी होती. भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त, स्वातंत्र्य देणारी. आपल्या मुलाबाळांना खुलेपणा देणारी. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मनसोक्त उपभोगू देणारी. त्यांच्या  आकांक्षांना नवीन ऊर्जा देणारी. म्हणून त्यांनी यांना निवडून दिले. पण धर्माच्या, झुंडशाहीच्या राजकारणात या साऱ्या केवळ कल्पनाच राहिल्या.

देशात दोन वेगवेगळ्या राज्यात बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यावरून संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुमत आहे तर जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर सत्तेत आहे. दोन्ही राज्यांतल्या जनतेला परिवर्तन हवे होते. नवी पारदर्शक व्यवस्था हवी होती. भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त, स्वातंत्र्य देणारी. आपल्या मुलाबाळांना खुलेपणा देणारी. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मनसोक्त उपभोगू देणारी. त्यांच्या  आकांक्षांना नवीन ऊर्जा देणारी. म्हणून त्यांनी यांना निवडून दिले. पण धर्माच्या, झुंडशाहीच्या राजकारणात या साऱ्या केवळ कल्पनाच राहिल्या. स्वप्नं उद्ध्वस्त झाली. जम्मू व काश्मीर राज्यातल्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षांची आसिफा ही मेंढपाळ मुलगी. बकरवाल समाज अनेक पिढ्यांपासून जंगलात पशुपालनाचा व्यवसाय करतो. हंगाम बदलेल तसा हा समाज आपला संसार गुंडाळून वेगेवेगळ्या परिसरात फिरत असतो. या समाजाला काश्मीर खोऱ्यातून हुसकावण्यासाठी एक मोठे कारस्थान रचले जाते. त्यात चिमुरड्या आसिफाला बळी बनवण्यात आले. जंगलात गुरं चरायला नेली असताना आसिफाचे अपहरण केले जाते व तिला गुंगीचे औषध देऊन आठ जणांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो. 

हे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून आसिफाचा दगडाने ठेचून खून केला जातो. जम्मू-काश्मीरमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर या राज्यात हिंदू-मुस्लिम तेढ अधिक वाढवण्यासाठी अनेक कटकारस्थाने रचली जात आहेत. त्यापैकी हे एक. गेले तीन महिने हे प्रकरण जम्मू-काश्मीरमध्ये समाज आणि राजकारणच्या केंद्रस्थानी आहे. चार्जशीट दाखल होऊ नये म्हणून जम्मूमधील वकिलांची एक गट भाजप कार्यकर्त्यांसह रस्त्यावर येते, बलात्काऱ्यांचा बचाव करण्यासाठी. बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे पोलिसांवर पक्षपाती ते हिंदूविरोधी असल्याचा आरोप बेधडकपणे करतात. जे पोलिस काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या विरोधात प्राणपणाने लढा देत आहेत त्यांना देशद्रोही ठरवण्याचा कार्यक्रम चालू आहे. 

यावर प्रतिक्रिया देताना आठ वर्षांच्या मृत मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, कोण हिंदू कोण मुसलमान हे त्या छोटय़ा मुलीला कसे माहिती असणार?.. त्यांना बदला घ्यायचाच होता तर, निष्पाप चिमकुलीवर का अत्याचार केले?.. तिला हात कुठला पाय कुठला हे देखील तिला समजत नव्हते.. डावा हात कुठला आणि उजवा कुठला हेही तिला ठाऊक नव्हते. वडिलांना तिला खासगी शिक्षण संस्थेत भरती करायचे होते. ‘ती डॉक्टर किंवा शिक्षक होईल अशी मोठी स्वप्ने आम्ही बघितली नव्हती. इतकेच वाटले होते की, थोडे शिकली तर स्वत: पायावर उभी राहील, स्वत:चे आयुष्य काढेल असे तिच्या घरच्यांना वाटत होते. परंतु आता हे सगळं व्यर्थ आहे कारण असिफा आता आपल्यात नाही. 

या घटनेतील दुसरी धक्कादायक बाब म्हणजे पीडितेचे पार्थिव दफन करण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कठुआत अल्पसंख्याक बकरावाल समाज आणि हिंदूमध्ये वाद असून या वादातूनच ग्रामस्थांनी दफनविधीसाठी जागा उपलब्ध करुन दिली नाही, असा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. माझ्या नातीचा मृतदेह सापडला त्यादिवशी काही ग्रामस्थांनी गावात दफनविधी करण्यास विरोध दर्शवला. ग्रामस्थांच्या विरोधामुळे आम्ही बराच वेळ थांबून होतो. शेवटी आम्हाला गावात दुसऱ्या ठिकाणी पार्थिवाला दफन करावे लागले, असे तिच्या आजोबांनी माध्यमांना सांगितले. या घटनेकडे पहिले तर आपण किती माणुसकी हरवून बसलो आहे हे लक्षात येते. 

दुसरी घटना आहे ती उत्तर प्रदेशातील उन्नावची. जून २०१७ मध्ये आमदार आणि त्यांच्या भावांनी बलात्कार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. ८ एप्रिल रोजी प्रकरणाचा योग्य तपास केला जात नसल्याचा आरोप करत तरुणीने योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसदेखील आरोपींना मदत करत असल्याचा आरोप तिने केला. धक्कादायक म्हणजे रविवारी पीडित तरुणीच्या वडिलांना अटक करण्यात आली. सोमवारी पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. अहवालानुसार, पीडित पप्पू सिंग याना आमदारांच्या चार साथीदार आणि पोलिसांनी बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले भाजपचे आमदार कुलदीप सेंगर यांच्या बचावासाठी बरेच प्रयत्न केले. भाजपच्याच एका नेत्याच्या दाव्यानुसार केलेल्या दाव्यानुसार, ‘योगी आदित्यनाथ यांनी कुलदीप सेंगर यांना अटक करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अटक करण्याची पूर्ण प्रक्रिया झाली होती. त्यांनी उन्नावच्या दोन आमदारांना निलंबित करण्याचाही निर्णय़ घेतला होता. पण एका प्रमुख व्यक्तीकडून फोन आला आणि त्यांनी आपला निर्णय बदलला. 

समाजाकडूनही संवेदनाची अपेक्षा 

संवेदना म्हणजे जाणीव. जाणीव म्हणजे जिवंतपणा. जे जाणवले त्यावर प्रतिक्रिया देणे, ही जिवंतपणाची खुण असते. जेव्हा कोणी एका मुलीवर बलात्कार होताना बघतो व त्यातुन तिला सोडवायला पुढे धाव घेतो, त्याला संवेदनाशील म्हणतात. जो बलात्कार होऊ देतो आणि नंतर तक्रार करायला जातो, त्याला संवेदनाशील म्हणता येईल काय? जो अन्याय, अत्याचार बघत बसतो आणि नंतर त्यावर तत्वज्ञान सांगतो, ते काय कामाचा? महाराष्ट्र्रात अशा अनेक घटना घडल्या आहेत त्याचे अनेक दाखले देता येतील. यापुढे जाऊन समाजातील काही घटक अशा पीडितेला मदत करायची सोडून त्या पीडितेचा व्हिडिओ काढतात.  हे का होऊ शकते? आपल्या म्हणजे समाजाच्या व नागरिकांच्या संवेदना बोथटल्याच्या त्या खुणा व लक्षणे नाहीत काय? एक दोन गुंड किंवा गुन्हेगार कुणाला असे मारू, जाळू शकतात, बलात्कार करु शकतात कारण आजचा समाज हतबल झाला आहे. तो अन्याय निमुटपणे बघतो, पण प्रतिकार करणार नाही, याची खात्री आहे आणि तेच अशा अन्याय अत्याचार करणार्‍यांचे बळ झाले आहे. कुठून आला हा बधीरपणा? आपण चिडणे, रागावणे, संतापुन जाणेच विसरून गेलो आहोत. पर्यायाने आपल्यातला सामुदायिक पुरूषार्थच झोपला आहे. अगतिकता आपला स्वभावधर्म झाला आहे. किंबहूना त्यालाच आजकाल सुसंस्कृतपणा म्हणून गौरवले जात असते. 

Web Title: Kathua and Unnao rape-murder case