
Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदियानंतर KCR च्या मुलीला होणार अटक?, वाचा काय आहे प्रकरण
Delhi Excise Policy Case : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना न्यायालयाने ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. न्यायालयात हजर केले असता सीबीआयने ५ दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने सीबीआयची मागणी मान्य केली आहे. सिसोदिया तपासात सहकार्य करत नाहीत, त्यामुळे कोठडीत चौकशीची गरज असल्याचा युक्तिवाद सीबीआयने न्यायालयात केला होता.
सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाने दिल्लीसह संपूर्ण देशात जोरदार निदर्शने केली. दिल्लीत शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सिसोदिया यांना भाजप सरकार खोट्या आरोपात अडकवत असल्याचा आरोप आम आदमी पक्ष करत आहे.
दरम्यान सिसोदिया यांच्यानंतर केसीआर यांच्या मुलीला देखील अटक होण्याची चर्चा आहे. तेलंगणाचे भाजप नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी सोमवारी दावा केला की तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या कविता यांनाही तपास यंत्रणा लवकरच अटक करतील.
भाजप नेते विवेक व्यंकटस्वामी म्हणाले, "दारू घोटाळ्यात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. कवितालाही लवकरच अटक करण्यात येईल. पंजाब आणि गुजरात निवडणुकीदरम्यान कविता यांनी आम आदमी पार्टीला १५० कोटी रुपये दिले.
यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात केसीआरची मुलगी कविता यांचे नाव आपल्या आरोपपत्रात ठेवले होते. त्यांच्यावर दारू कंपनीत ६५ टक्के हिस्सा असल्याचा आरोप केला होता.