दिल्ली: प्रदुषणासंदर्भात आणीबाणीची बैठक

वृत्तसंस्था
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

दिवाळी आणि वाहनांच्या प्रदूषणानंतर दिल्ली काळ्या धुरक्याच्या चादरीखाली गडप झाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना यामुळे श्वास घेणेही अवघड झाले आहे. यामुळे दिल्लीतील सर्व सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमधील प्रदुषणाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्‍वभूमीवर या राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज (रविवार) सकाळी आणीबाणीची बैठक बोलाविल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून यामध्ये प्रदुषणाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी जेट स्प्रिंकलिंग आणि डस्ट स्वीप मशिन्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

दिल्लीमधील प्रदुषणाची समस्या अत्यंत गंभीर झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने दिल्ली शेजारील सर्व राज्यांमधील पर्यावरण मंत्र्यांची बैठक बोलाविली आहे. तेव्हा केजरीवाल यांनीही ही बैठक निमंत्रित केली आहे. दिल्लीशेजारील राज्यांमध्ये पीके जाळण्याची पद्धत त्वरित थांबविण्यात यावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. केजरीवाल यांनी काल (शनिवार) केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे यांची भेट घेत याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. दवे यांनी यानंतर दिल्लीमध्ये आणीबाणी घोषित करत परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त केले होते. पंजाब व हरयाना राज्यामधील पीके जाळण्याची पद्धत दिल्लीमधील प्रदुषणास जबाबदार असल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे.

दिवाळी आणि वाहनांच्या प्रदूषणानंतर दिल्ली काळ्या धुरक्याच्या चादरीखाली गडप झाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना यामुळे श्वास घेणेही अवघड झाले आहे. यामुळे दिल्लीतील सर्व सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गुरुग्राममधल्या शाळांना 3 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. दिल्लीच्या इतिहासातील हे 17 वर्षातील सर्वांत धोकादायक धुरके आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. 

दिल्लीच्या हवेत प्रदूषणाच्या पातळीत सतत वाढ होत आहे. राष्ट्रीय हरित लवादानेही दिल्ली सरकारला या मुद्द्यावरुन फटकारले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: kejriwal calls for an emergency meeting