केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने केरळला झोडपून काढले असून, त्यामुळे राज्यातील पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केली. 

तिरुअनंतपुरम- मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने केरळला झोडपून काढले असून, त्यामुळे राज्यातील पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केली. 

इडुक्की जिल्ह्यातील इडुक्की धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कट्टापाना येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहाणार होते. मात्र, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हॅलिकॉप्टर येथे उतरू शकले नाही, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री वायनाडकडे रवाना झाले. तेथे त्यांनी मदत छावण्यांना भेट दिल्याचे सांगण्यात आले. तसेच, जिल्ह्याधिकारी कार्यालयात बैठकही घेतली. 

हवाई पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसमवेत विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथाला, महसूलमंत्री ई. चंद्रशेखरन, मुख्य सचिव आदी सहभागी झाले होते. केरळमध्ये पुरामुळे बळी गेलेल्यांची संख्या 29 वर पोचली असून, सुमारे 50 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे. 

"रेड अलर्ट' घोषित जिल्हे 
- इडुक्की 
- वायनाड 
- मलप्पुरम 
- कोझिकोड 
- पलक्कड 
- कोट्टायम 
- अलाप्पुझा 

Web Title: Kerala Chief Minister Takes Aerial Survey Of Flood Hit Districts