केरळ सरकारची मोफत लशीची घोषणा भाजपला पचेना; निवडणूक आयोगाकडे तक्रार

टीम ई सकाळ
Monday, 14 December 2020

केरळमध्ये निवडणुकीमुळे वातावरण तापलं असून फ्री कोरोना व्हॅक्सिनचा मुद्द्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यातील सर्व लोकांना मोफत व्हॅक्सिन देणार असल्याचं म्हटलं होतं.

तिरुवनंतपूरम - केरळमध्ये निवडणुकीमुळे वातावरण तापलं असून फ्री कोरोना व्हॅक्सिनचा मुद्द्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यातील सर्व लोकांना मोफत व्हॅक्सिन देणार असल्याचं म्हटलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार करणाऱ्या पक्षांमध्ये भाजपचासुद्धा समावेश आहे.भाजपने बिहारच्या निवडणुकीत त्यांच्या जाहीरनाम्यात मोफत व्हॅक्सन देण्याचं आश्वासन दिलं होतं. 

केरळमधील निवडणुका लवकरच होणार असून चार जिल्ह्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी असं म्हटलं आहे की, मोफत व्हॅक्सिनची घोषणा करून सरकार निवडणुकीवर प्रभाव पाडत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मॉडेल कोटचं उल्लंघन असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी म्हटलं होतं की, राज्यात सर्वांना मोफत व्हॅक्सिन दिलं जाईल. कन्नूर इथं पत्रकार परिषदेत त्यांनी व्हॅक्सिनसाठी कोणालाही पैसे द्यावे लागणार नाही आणि ही आमच्या सरकारची भूमिका आहे अशंही त्यांनी सांगितलं होतं. याशिवाय केरळला मिळणाऱ्या व्हॅक्सिन डोसची संख्याही सांगितली होती. अद्याप केंद्र सरकारने मात्र अशा प्रकारे कोणत्या राज्याला किती डोस मिळतील हे सांगितलेलं नाही.

हे वाचा - कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठीची नोंदणी पुर्ण; 4 कोटी डोस तयार

कोरोनाच्या देशभरातील आकडेवारीनुसार केरळ सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये आतापर्यंत एकूण 6 लाख 64 हजार 633 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 595 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार भारत बायोटेक, सीरम आणि फायजरच्या व्हॅक्सिनला मंजुरी देण्याचा विचार करत असल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. लवकरच या लशींना मंजुरी मिळण्याची आशा असून याशिवाय पाच व्हॅक्सिन क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kerala cm p vijayan says free covid vaccin for all then bjp complaint in EC