Kerala Floods: अन्न आणि पाण्यावाचून केरळच्या लोकांचे हाल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीरच असून, छोट्या बेटावर हजारो लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकले असताना बचाव पथकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. अलाप्पुझा शहरालाही आज सकाळपासून हळूहळू पुराच्या पाण्याचा वेढा पडू लागला आहे. त्यातच हवामान विभागाने आगामी दोन दिवसांत आणखी पावसाची शक्‍यता वर्तविल्यामुळे पुराचा धोका वाढतच चालला आहे. पाण्याची पातळीही हळूहळू वाढत असल्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेचा बिकट प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

त्रिवेंद्रम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीरच असून, छोट्या बेटावर हजारो लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकले असताना बचाव पथकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. अलाप्पुझा शहरालाही आज सकाळपासून हळूहळू पुराच्या पाण्याचा वेढा पडू लागला आहे. त्यातच हवामान विभागाने आगामी दोन दिवसांत आणखी पावसाची शक्‍यता वर्तविल्यामुळे पुराचा धोका वाढतच चालला आहे. पाण्याची पातळीही हळूहळू वाढत असल्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेचा बिकट प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

चर्च परिसरात आढळून आलेल्या सहा मृतदेहांची ओळख पटली असून, चेंगन्नूर येथे 20 मृतदेह आढळून आल्याचेही वृत्त आहे. पावसाच्या शक्‍यतेच्या पार्श्‍वभूमीवर 11 जिल्ह्यांत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, अलाप्पुझा येथे बचाव मोहिमेला नकार देणाऱ्या 30 मोटर बोटी जिल्हा प्रशासनाने जप्त केल्या आहेत. या बोटीच्या मालकांना अटक करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत. 

पूरग्रस्त भागात पाण्याची पातळी अजूनही कमी झालेली नाही. मात्र, काल (शुक्रवारी) आणि आज (शनिवारी) पाऊन नसल्यामुळे बचाव मोहिमेला वेग आला आहे. लष्कराने त्रिवेंद्रम विमानतळावरून आणखी 20 बोटी आणल्या आहे. अनेक ठिकाणांचा संपर्क तुटला असून, तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लोकांना अन्न आणि पाण्यावाचून राहावे लागत आहे. 

राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम राबविली जात आहे. पम्पा नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत. अनेक लोक इमारतींच्या छतावर आश्रय घेत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, अन्नाची मदत काही ठिकाणीच पोचली जात आहे. अनेक भागातील वीज आणि संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. 

लढाऊ वृत्तीबद्दल केरळच्या लोकांना मी सलाम करतो. या आपत्तीच्या काळात संपूर्ण देश केरळच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. केरळच्या लोकांची सुरक्षा आणि कल्याणासाठी आम्ही प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

तसेच, आपत्तीच्या काळात केंद्र सरकार केरळकडे दुर्लक्ष करत आहे. राज्याने 2 हजार कोटी रुपयांची तातडीची मदत मागितली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली मदत पुरेशी नसल्याचे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.  
अन्य राज्यांचाही केरळला मदतीचा हात 
- बचाव मोहिमेस सहकार्य करण्यासाठी ओडिशा सरकारने मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या निर्देशांनुसार मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली 245 कर्मचारी अत्याधुनिक उपकरणांसह केरळला पाठविले. 
- आम आदमी पक्षाचे खासदार, आमदार आणि मंत्री केरळसाठी त्यांचे एक महिन्याचे वेतन देणार असल्याची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती. दिल्ली सरकारने काल दहा कोटींची मदतही जाहीर केली आहे. 
- गुजरात सरकारकडून केरळसाठी दहा कोटी रुपयांची मदत 

सर्वांत मोठी बचाव मोहीम 
58 : राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके कार्यरत 
35-40 : प्रत्येक पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या 
194 : लोकांना पुरातून वाचविण्यात यश 
10467 : लोकांना सुरक्षितस्थळी पोचविले 

8 ऑगस्टपासून... 
194 : लोकांचा मृत्यू 
36 : लोक बेपत्ता 
3.14 लाख : मदत शिबिरात

Web Title: kerala floods bad situation of people of Kerala without food and water