Coronavirus: 'मॉडेल' सांगणाऱ्या केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक; रुग्णसंख्येत देशात टॉप 3मध्ये

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 1 October 2020

30 जानेवारीला देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळ राज्यात आढळला होता.

कोची: 30 जानेवारीला देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळ राज्यात आढळला होता. त्यानंतर देशभरात कोरोना प्रसार मोठ्या प्रमाणात होत गेला. दरम्यान केरळमध्ये कोरोनाची रुग्णवाढ कमी करण्यात राज्य सरकारला यश आलं होते. याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरही केरळ राज्याची कोरोनाविरुध्दच्या यशस्वी लढ्याबद्दल स्तुती झाली होती. पण आता केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून राज्यातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. 

प्रति आठवडा 10 लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णांच्या संख्येत केरळ देशात राज्य तिसऱ्या स्थानावर पोहचलं आहे. 19 ते 26 सप्टेंबर या आठवड्यात केरळमध्ये 10 लाख लोकसंख्येमागे 158 नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालं होतं. तर मागील आठवड्यात हा आकडा 111 रुग्ण आहे. यावरून केरळ राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोनाचा प्रसारही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. प्रति आठवडा 10 लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णवाढीत दिल्ली 212 रुग्णांसह पहिल्या स्थानावर तर 169 रुग्णांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. 

जम्मू काश्मीरमध्ये जवान हुतात्मा; पाककडून सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 63 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाने 1,181 रुग्णांचा मृत्यू झाला असून 86 हजार 821 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंंत कोरोनाने 98 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 2 दिवसांत कोरोना रुग्णांची आकडेवारी 80 हजारांच्या खाली गेल्याने दिलासादायक स्थिती निर्माण झाली होती. पण मागील 24 तासांतील वाढ जवळपास 90 हजारांच्या जवळ गेल्याने चिंतेत वाढ झाली आहे. 

अनलॉक 5: चित्रपटगृहे खुली होणार; केंद्र सरकारने जारी केली नियमावली

देशातील कोरोनाची बाधा (COVID19) झालेल्यांचा आकडा 63 लाख 12 हजार 585 झाला आहे. सध्या देशात 9 लाख 40 हजार 705 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत 52 लाख 73 हजार 202 जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे. 

कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यांनी चिंता वाढत असताना सरकारने आता अनलॉक 5 सुरु केले आहे. अनलॉक 5 मध्ये काढलेल्या निर्बंधामुळे देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू शकते. यामध्ये राज्यांतर्गत रेल्वेसेवा, बार, उपाहारगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kerala in top 3 states of corona patients