माता न तू वैरीणी! अल्लाला खूष करण्यासाठी शिक्षिकेनं दिला 6 वर्षाच्या लेकराचा बळी

टीम ई सकाळ
Monday, 8 February 2021

‘अल्लाला खूष करण्यासाठी मुलाची कुर्बानी दिली’, अशी माहिती तिने स्वत:च पोलिसांना फोन करून दिली. खुनाच्या आरोपावरून शाहिदाला अटक झाली आहे.

पलक्कड - पोटच्या गोळ्याला तळहातावरच्या फोडासारखं जपणारे आई वडील असतात. पण याच धारणेला धक्का देणारी घटना केरळमध्ये घडली आहे. अंधश्रद्धेच्या प्रकारातून हे कृत्य झालं असल्याची माहिती समोर येत आहे. माता न तू वैरीणी असाच काहीसा संताप व्यक्त केला जात आहे. मदरशात शिक्षिका असलेल्या आईने सहा वर्षाच्या लेकराचा बळी दिला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  मदरशामधील शिक्षिका असलेल्या शाहिदाने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलाचा बळी दिल्याची घटना रविवारी (ता.७) उघडकीस आली. ‘अल्लाला खूष करण्यासाठी मुलाची कुर्बानी दिली’, अशी माहिती तिने स्वत:च पोलिसांना फोन करून दिली. खुनाच्या आरोपावरून शाहिदाला अटक झाली आहे.

हे वाचा - संतापजनक! अपहरणानंतर तरुणीची सातवेळा विक्री, शेवटी आत्महत्येनं केली सुटका

शाहिदा (वय 30) पुथुपल्लीथिरुव येथील रहिवासी असून तीन मुलांची आई आहे. नजीकच्या एक मदरशात ती शिक्षिका आहे. ती गर्भवती असून तिने ज्या मुलाची गळा चिरून हत्या केली तो आमिल तीन भावंडांत सर्वांत लहान होता. तो तिच्याजवळ झोपला असताना त्याला उठवून ती स्वच्छतागृहात घेऊन गेली. त्याचे पाय तिने बांधल्यानंतर तिने त्याचा गळा चिरला. ही घटना पहाटे चार वाजता घडली. त्यावेळी महिलेचा पती सुलेमान दुसऱ्या खोलीत दोन मुलांसह झोपला होता. तो आखाती प्रदेशातील नोकरी सोडून नुकताच गावी परतला होता. पल्लकडमध्ये तो सध्या टॅक्सी चालक म्हणून काम करीत आहे.

हे वाचा - पास करा नाहीतर माझं लग्न मोडेल, उत्तरपत्रिकेतून आल्या अजबगजब विनंत्या

शाहिदाने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली पल्लकड पोलिसांना दूरध्वनी करून दिली. ‘अल्लाला कुर्बानी’ म्हणून आमिलचा जीव घेतल्याचे तिने पोलिसांना सांगितले. घटनेच्या आदल्या रात्री शाहिदाने जनमैत्री पोलिस स्थानकाचा दूरध्वनी क्रमांक शेजाऱ्यांकडे मागितला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kerala woman kills 6 year old son says sacrifice to god