पास करा नाहीतर माझं लग्न मोडेल, उत्तरपत्रिकेतून आल्या अजबगजब विनंत्या

टीम ई सकाळ
Monday, 8 February 2021

परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास कमी करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या कल्पना लढवत असतात. मग त्यात कॉपी करणं असो किंवा डमी बसवणं असो.

पाटणा - परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास कमी करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या कल्पना लढवत असतात. मग त्यात कॉपी करणं असो किंवा डमी बसवणं असो. याशिवाय काही महाभाग तर पेपर तपासणाऱ्यांसाठी उत्तर पत्रिकेत लाच म्हणून पैसेही ठेवतात. आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. पाटलीपुत्र विद्यापीठाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यानं असा मेसेज लिहिला की तपासणाऱ्यालाही प्रश्न पडला. 

कोरोनामुळे 2020 मध्ये मार्चपासून बिहारमधील सर्व कॉलेजेस बंद करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. या काळात ऑनलाइन शिक्षण सुरु होतं. अखेर नव्या वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कॉलेजमध्ये नियमित वर्ग सुरु करण्यात आले. यात फक्त अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत क्लास घेण्याच परवानगी दिली आहे. 

हे वाचा - संतापजनक! अपहरणानंतर तरुणीची सातवेळा विक्री, शेवटी आत्महत्येनं केली सुटका

पहिल्या वर्षाचे पेपरची तपासणी सुरु आहे. जेडी वुमेन्स कॉलेजमध्ये उत्तरपत्रिकांची तपासणी केली जात आहे. यावेळी एका उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्याने केलेली विनंती शिक्षकांना धक्का देणारी अशीच आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अशी विनंती केली आहे की, कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानं अभ्यास झालेला नाही म्हणून पास करा. एकाने चक्क म्हटलं की, काही दिवसातच माझं लग्न होणार आहे आणि परीक्षा पास झालो नाही तर लग्न तुटेल अशी विनवणी केली आहे. याशिवाय काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कारणं देत परीक्षेचा अभ्यास झाला नसल्याचं म्हटलं आहे. 

हे वाचा - आंदोलक शेतकऱ्याने टिकरी सीमेवर गळफास घेऊन केली आत्महत्या; चिठ्ठी लिहून केंद्र सरकारवर केले आरोप

पाटलीपुत्र विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर प्रवीण कुमार यांनी सांगितलं की, सर्व कॉलेजमद्ये ऑनलाइन क्लासेस घेऊनच अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यानंतर कोणाकडूनही लॉकडाऊन किंवा कोरोना यांची कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत. परीक्षक त्यांचे काम योग्य पद्धतीने करत आहेत. तपासणीचं काम शेवटच्या टप्प्यात आलं असून पुढच्या दोन आठवड्यात सर्व निकाल लागतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patna students wrote messages ba examination answer books