esakal | कोरोनाबाधित महिलेला बेडला बांधून घातलं; काँग्रेसने केली कारवाईची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

women tied

महिलेचे नातेवाईक जेव्हा तिला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले तेव्हा महिला फरशीवर पडलेली दिसली. जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला बांधून घालण्यात आलं होतं. 

कोरोनाबाधित महिलेला बेडला बांधून घातलं; काँग्रेसने केली कारवाईची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिरुवनंतपुरम- केरळमधील काँग्रेस खासदार टीएन प्रथपन यांनी आरोग्यमंत्री केके शैलजा यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी एका कोरोनाबाधित 67 महिलेसोबत अमानुष वागणूक केल्याबद्दल कारवाईची मागणी केली आहे. संबंधित महिलेच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये महिला जमिनीवर पडली होती. तिच्या शरिरातून रक्त वाहत असलेल्या अवस्थेतील फोटोही व्हायरल झाला आहे.

कुटुंबाने आरोप केला की, तिचे हात बेडला बांधलेल्या अवस्थेत होते. रुग्णालय प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्णालय प्रशासनाने म्हटलं की, हात बांधलेला नव्हता. मात्र एका मानसोपचारतज्ज्ञाच्या सल्ल्यानंतर त्यांना तसं ठेवण्यात आलं होतं. संबंधित महिलेला लावण्यात आलेली सलाइनची सुई तिने काढू नये यासाठी तसं करण्यात आलं होतं. 

काँग्रेस नेत्यानं पत्रात लिहिलं की, वयोवृद्ध महिलेला 20 ऑक्टोबर रोजी कोरोना प्राथमिक उपचार केंद्रातून त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं होतं. महिलेला असा बेड देण्यात आला होता ज्याच्या बाजूला रेलिंग नव्हतं. तिचे हात अंथरुणासोबत कापडाने बांधले होते. महिला अंथरुणावरून खाली पडल्यानं तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागला. त्यामुळे रक्त येत होतं. 

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदारांनी केली आहे. एका कोरोनाबाधित महिलेला बांधून घालण्यात आलं हे धक्कादायक आहे. गव्हर्नमेंट मेडिकलमध्ये एक रेलिंग असलेला बेड देता आला नाही का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

हे वाचा - मुफ्ती यांचे मानसिक संतुलन बिघडले; विहिंप यांचा आरोप

त्रिशूर मेडिकल कॉलेजवर टीएन प्रथपन यांनी आरोप केला की, सध्या कोरोनाशी संबंधित मानसिक आरोग्याच्या मुद्द्यांसह उपचारासाठी मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याची सेवा नाही. कुटुंबाने वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे तक्रार आणि संबंधित प्रकाराचे फोटो दिल्यानंतरही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत एनडीटीव्हीला महिलेच्या जावयाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, तिच्या कुटुंबातील सहाजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

महिलेचे नातेवाईक जेव्हा तिला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले तेव्हा महिला फरशीवर पडलेली दिसली. जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला बांधून घालण्यात आलं होतं. इतर रुग्णांनी त्याचे व्हिडिओ शूट केले असंही महिलेच्या नातेवाईकांनी म्हटलं. 

मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की, रुग्णालय प्रशासनावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याने महिलेला नियंत्रणात ठेवण्यासाठी ते केलं होतं. तसंच महिला बेडवरून खाली पडली ते दुर्दैवी होतं. तिला गंभीर दुखापत झालेली नाही. याबाबत आरोग्य मंत्रालयाकडे सविस्तर अहवाल पाठवण्यात आला असल्याचंही रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे.