भटक्‍या कुत्र्यांना मारा; सुवर्ण नाणे मिळवा

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

लोकांच्या संरक्षणासाठी आम्ही ही मोहीम राबवित आहोत, जास्तीत जास्त कुत्र्यांना मारल्याने लोक सुरक्षित होतील.
- जेम्स पम्बायक्कल, विद्यार्थी संघटनेचे सहायक सरचिटणीस

तिरुअनंतपुरम - केरळमध्ये भटक्‍या कुत्र्यांचे माणसांवरील हल्ले वाढल्याने स्थानिक प्रशासन जेरीस आले असताना आता या विरोधात काही स्वयंसेवी आणि विद्यार्थी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. केरळमध्ये मागील चार महिन्यांत कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये सातशे नागरिक जखमी झाले असून, चौघा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

या श्‍वान हल्ल्याच्या समस्येचा सामना करण्यासाठी येथील प्रतिष्ठित महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेने जी स्थानिक स्वराज्य संस्था सर्वाधिक कुत्र्यांना मारेल, तिच्या प्रमुखांचा सोन्याचे नाणे देऊन गौरव करण्याचे ठरवले आहे.

राज्यभरातील महापालिका आणि पंचायतीच्या प्रमुखांना हे बक्षीस दिले जाणार असल्याचे पाला येथील "सेंट थॉमस कॉलेजमधील स्टुडंट वेल्फेअर असोसिएशन'च्या अधिकाऱ्यांनी ही घोषणा केली आहे. मध्यंतरी याच संघटनेने कुत्र्यांना ठार मारण्यासाठी सवलतीच्या दरामध्ये बंदूक देण्याची घोषणा केली होती. राज्यातील उद्योजकांनीही श्‍वान हटाव मोहिमेसाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे या मोहिमेस अधिक वेग येऊ शकतो. या मोहिमेमध्ये लोकांना अधिकाधिक सहभागी करून घेतले जाणार असून, त्यांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी केली जाईल. या मोहिमेसाठी वितरित केल्या जाणाऱ्या सूवर्ण नाण्यांचे संकलन करण्यासाठी संघटनेच्या बाराशे सदस्यांकडून निधी संकलित केला जाणार आहे. या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तारीखदेखील निश्‍चित करण्यात आली आहे.

श्‍वानदंश (चार महिने)
श्‍वान हल्ल्यातील जखमी नागरिक - 701
जखमी मुले - 175
उपचार घेत असलेले नागरिक - 53000

Web Title: kill stray dogs, get a gold coin in kerala