सरकार-नायब राज्यपाल पुद्दुचेरीत आमने सामने

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

गेल्या काही दिवसांत अधिकाऱ्यांनी व्हॉट्‌स ऍपद्वारे संवाद करावा यासाठी बेदी यांनी प्रयत्न चालविले होते. असे असताना दोन जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी पुद्दुचेरीतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजातील संवादासाठी ट्‌विटर, फेसबुक, व्हॉट्‌स ऍपसारख्या सोशल मीडियातील माध्यमांचा वापर न करण्याचा आदेश दिला होता.

पुद्दुचेरी/नवी दिल्ली - अधिकृत कार्यालयीन कामकाजासाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांचा निर्णय नायब राज्यपाल किरण बेदी यांनी आज रद्दबातल ठरविला. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस सरकार व नायब राज्यपालांमधील तणाव वाढणार आहे.

सध्या दिल्लीत असलेल्या किरण बेदी यांनी हे सरकारी परिपत्रक रद्द करत असल्याचा निर्णय ट्‌विटरद्वारे जाहीर केला आहे. "पुद्दुचेरी हा पुरोगामी केंद्रशासित प्रदेश असेल, तर तेथील संवाद प्रक्रिया प्रतिगामी करता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश रद्द करण्यात येत आहे,' अशा शब्दांत बेदी यांनी ट्विट केले आहे.

गेल्या काही दिवसांत अधिकाऱ्यांनी व्हॉट्‌स ऍपद्वारे संवाद करावा यासाठी बेदी यांनी प्रयत्न चालविले होते. असे असताना दोन जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी पुद्दुचेरीतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजातील संवादासाठी ट्‌विटर, फेसबुक, व्हॉट्‌स ऍपसारख्या सोशल मीडियातील माध्यमांचा वापर न करण्याचा आदेश दिला होता. त्यामागे फेसबुक, व्हॉट्‌स ऍपसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सर्व्हर्स देशाबाहेर असल्याचे कारण देण्यात आले होते.

"सोशल मीडियाचा कार्यालयीन संवादासाठी वापर केल्याने केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा तसेच गोपनीय कायद्याचा भंग होतो. या बाबीचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी प्रकर्षाने काळजी घ्यावी. कोणीही उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,' असे मुख्यमंत्र्यांनी या परिपत्रकात म्हटले होते.

हा आदेश प्रतिगामी असल्याचे सांगून बेदी म्हणाल्या, की केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध हे वागणे आहे. संवादाची ताकद मुख्यमंत्री कशी काय हिरावून घेऊ शकतात? त्यामुळेच मी हा आदेश रद्दबातल ठरविला आहे. याची माहिती मी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, माहिती व प्रसारणमंत्री रवी शंकर प्रसाद, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांना दिली आहे. याला कसा प्रतिसाद द्यायचा हे आता केंद्राच्या हाती आहे.

Web Title: Kiran Bedi cancels Puducherry CM’s circular